राज ठाकरे जुन्या बालेकिल्ल्यात तळ ठोकणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा आपले लक्ष नाशिक या जुन्या बालेकिल्ल्यावर केंद्रित करण्याची तयारी सुरू केली असून, सप्टेंबरअखेर ते नाशिकला तळ ठोकणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन मनसेची सभासद नोंदणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.

पुणे येथून राज ठाकरे गुरुवारी (दि.25) सभासद नोंदणीचा प्रारंभ करणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही सभासद नोंदणी केली जाणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या भूमिकेचे पडसाद नाशिकमध्ये उमटले होते. भोंगेविरोधी आंदोलनामध्ये नाशिकमधील मनसैनिक आक्रमक झालेले पाहावयास मिळाले होते. राज ठाकरे यांचा नाशिक दौरा तोंडावर असतानाच त्यांच्या पाठीच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे नाशिकचा दौरा मागे पडला होता. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिकमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद सुरू ठेवला. आता राज ठाकरेंची प्रकृती सुधारल्याने मुंबईसह ठाणे, पुणे नाशिक व औरंगाबाद या शहरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन केले असून, सप्टेंबरअखेर त्यांचा नाशिक दौरा होणार आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात ठाकरे हे नाशिकला आले होते. त्यानंतर त्यांचा दौरा लांबणीवर पडत गेला.

अमित ठाकरे यांनी ऑगस्ट महिन्यात दुसर्‍या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधत त्यांना पक्षात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. स्वतःचा मोबाइल क्रमांकदेखील त्यांनी देत कधीही संपर्क साधण्याचे आवाहन केले होते.

पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविणार
मनसैनिक तसेच पदाधिकार्‍यांना घरोघरी जाऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासद नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सभासद नोंदणीकरता विशेषत: शाळा, महाविद्यालय तसेच मॉल्स, रेल्वेस्टेशन, बसस्थानके, बाजारपेठ यासारखी गर्दीची ठिकाणे निवडण्याची सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. सभासद नोंदणीबरोबरच मनसेची ध्येयधोरणे याबाबतही नागरिकांमध्ये जागृती करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा :

The post राज ठाकरे जुन्या बालेकिल्ल्यात तळ ठोकणार appeared first on पुढारी.