राम मंदिर सोहळ्यासाठी मुस्लिम युवती पायी निघाली अयोध्येला

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेमुळे उत्साहाचे वातावरण असताना आपल्या दोघा मित्रांसह मुंबईहून अयोध्येच्या दिशेने पायी निघालेल्या एका मुस्लिम युवतीने एकात्मतेचा संदेश दिला आहे.

अयोध्या येथे जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची भावना तिने आपल्या प्रवासादरम्यान नाशिक येथे व्यक्त केली.
अयोध्या येथे या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्त मुस्लिम युवती दोन मित्रांसह मुंबई येथून अयोध्येला पायी निघाली आहे. शबनम शेख असे तिचे नाव असून, रमनराज शर्मा आणि बिनीत पांडे अशी तिच्या दोन मित्रांची नावे आहेत. यात्रेच्या पाचव्या दिवशी प्रवासादरम्यान हे तिघे सोमवारी नाशिकला आले होते. नंतर नाशिकहून ते पुढे रवाना झाले. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून, याबाबत एका बाजूने विचार न करता दोन्हीही बाजूंनी विचार केला जावा, अशी अपेक्षा शबनमने व्यक्त केली. रामायणाबाबत अनेक गोष्टी कानी पडल्यामुळे प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आपल्या मनात आस्था आहे. अयोध्येत जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची भावनाही तिने व्यक्त केली.

अयोध्यावारीत स्वच्छतेचाही संदेश

मुंबईहून अयोध्येच्या दिशेने पायी प्रवास करताना हे तिघे मित्र स्वच्छतेचा संदेशही देत आहेत. ‘ग्रीन इंडिया, क्लीन इंडिया’चे बॅनर घेऊन हे त्रिकूट अयोध्येच्या दिशेने निघाले आहे. भारत हा वेगाने विकसित होणारा देश असून, आपल्या देशात स्वच्छता ठेवणे हे आपले कर्तव्य असल्याचे शबनमने सांगितले.

The post राम मंदिर सोहळ्यासाठी मुस्लिम युवती पायी निघाली अयोध्येला appeared first on पुढारी.