शीतपेयांमधील दूषित बर्फ ठरतोय जीवघेणा! विषाणूंच्या प्रवेशाची शक्यता

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
सध्या तीव्र उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर आपल्याला शीतपेये, बर्फाचा गोळा विविध आइस्क्रीम विक्री करताना विक्रेते दिसत आहेत. मात्र, तात्पुरता थंडावा मिळण्यासाठी असलेले हे शीतपेय, आइस्क्रीम यांमध्ये असलेला बर्फ किती चांगला आहे हे बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

मुळात बर्फ हा शरीरासाठी उष्ण समजला जातो. तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या शीतपेयांमध्ये विविध रसायनांचा वापर केला जातो. ही रसायने आरोग्याला अपायकारक ठरतात. बाजारात उपलब्ध असलेल्या बर्फाचा अनेक ठिकाणी वापर करण्यात येतो. यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा बर्फ तयार करताना वापरण्यात येणारे साचे, पाणी तसेच तो बर्फ बाजारात आणताना होत असलेली वाहतूक किती स्वच्छ आहे, हे महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा बर्फाच्या वाहतुकीने नागरिकांमध्ये आजार बळकवत आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत तात्पुरते आल्हाददायक वाटणारे ज्यूस, बर्फाचे गोळे, आइस्क्रीम टाळावे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

या आजारांची शक्यता
शीतपेयांमध्ये सोड्याचे प्रमाण जास्त असल्याने ते आरोग्यासाठी घातक असते. त्यामुळे तोंडाचे आरोग्य बिघडते. दातांवर शीतपेयांचे थर साचल्याने दात लवकर किडतात. त्याचप्रमाणे हाडांमध्ये असणाऱ्या खनिजांवर सोड्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि वारंवार फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. तसेच शीतपेयांमध्ये असणाऱ्या कॅफीनमुळे शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे शरीराबाहेर जाते. त्यामुळेही हाडांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती ठिसूळ होतात. यातील सोड्याच्या प्रमाणामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे जे लोक जास्त प्रमाणात शीतपेये घेतात, त्यांच्यात लठ्ठपणाची समस्या आढळून येते. लठ्ठपणामुळे मधुमेह आणि इतरही अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

असा तयार होतो बर्फ
बर्फ तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये मशीन सुरू करून बर्फ तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. याठिकाणी असलेले यंत्र गोठवणार्या वायूला थंड करतो. हा थंड वायू मोठ्या टाकीमध्ये साठविला जातो, जो एका वेळी अनेक बर्फाच्या लाद्या गोठवू शकतो. बर्फाचे साचे बुडविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्यात मीठाचे अनेक तुकडे जोडले जातात. त्यानंतर साचे स्वच्छ केले जातात आणि मीठ विरघळलेल्या पाण्यात साचे ओळीने ठेवले जातात. खाऱ्या पाण्यात साचे सलग टाकल्यानंतर ते पाण्याने भरले जातात. त्यानंतर, खाऱ्या पाण्याखालून जाणार्‍या कूलिंग कॉइलमधून थंड वायू सोडला जातो, ज्यामुळे खारट पाणी थंड होते आणि त्याच्या थंडपणामुळे साच्यात भरलेल्या पाण्याचा बर्फ तयार होतो. त्यानंतर हूकच्या साहाय्याने हे साचे बाहेर काढले जातात.

हेही वाचा:

The post शीतपेयांमधील दूषित बर्फ ठरतोय जीवघेणा! विषाणूंच्या प्रवेशाची शक्यता appeared first on पुढारी.