पोलिस आयुक्तालयाची स्मार्ट सिटी ठेकेदाराला कारवाईची तंबी

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप कार्यान्वित न झाल्याने पोलिस आयुक्तालयाने संबंधित ठेकेदाराची कानउघडणी केली आहे. गत तीन वर्षांपासून वारंवार मुदतवाढ मागूनही सीसीटीव्ही कार्यान्वित झालेले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक नियोजन, गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना अद्याप ‘सीसीटीव्ही’ची अपेक्षित मदत मिळत नाही. एप्रिलअखेर सीसीटीव्ही सुरू न झाल्यास कारवाई करण्याची तंबी ठेकेदारास देण्यात आली आहे.

शहराच्या प्रत्येक घडामोडी, हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात प्रत्येक सिग्नल, महत्त्वाचे चौक, परिसरांमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत हे काम सुरू आहे. या यंत्रणेमार्फत शहरावर नजर ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीत जून २०२३ मध्ये नियंत्रण कक्ष अद्ययावत करण्यात आला आहे. मोठे स्क्रीन, तज्ज्ञ पाेलिस अधिकारी व अंमलदार नियुक्त केले असून, त्यांच्या मदतीने शहरातील वाहतूक नियोजन, गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. मात्र, अद्याप या नियंत्रण कक्षात शहरातील सर्व सीसीटीव्हींचा ‘फिड’ मिळत नसल्याने या कामावर मर्यादा आल्या आहेत.

शहरातील सीबीएस, मेहेर व अशोक स्तंभ वगळता इतर चौकांतील सीसीटीव्हींचा ‘फिड’ पोलिसांना मिळत नाही. यासह ई-चलान अंतर्गत बेशिस्त चालकांवरील कारवाईदेखील अद्याप सीसीटीव्हीवरून सुरू झालेली नाही. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणासह कायदेशीर कारवाईत पोलिसांना अडचणी येत आहेत. गुन्हा घडल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसल्याच्याही तक्रारी पोलिसांना आहेत. मात्र, सीसीटीव्ही सुरू नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे एप्रिलअखेर शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची तंबी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित ठेकेदारास दिली आहे. सीसीटीव्हीमुळे प्रमुख मार्ग, चौक अन‌् स्थळ सुमारे ८०० ‘सीसीटीव्हीं’च्या टप्प्यात येणार आहे.

या यंत्रणेसाठी १८९ कोटींचा निधी खर्च
स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एप्रिलअखेर सर्व सीसीटीव्ही सुरू करावेत, असे ठेकेदारास सांगितले आहे. सीसीटीव्हींमुळे शहरातील प्रत्येक चौकांमधील हालचालींवर लक्ष ठेवता येईल. – संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त.

हेही वाचा:

The post पोलिस आयुक्तालयाची स्मार्ट सिटी ठेकेदाराला कारवाईची तंबी appeared first on पुढारी.