पाणीटंचाईचा आढावा : पालकमंत्री घेणार आज बैठक

Water Cut pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर व परिसरात आजच्या घडीला पाण्याचा तुटवडा नसल्याने तुर्तास पाणी कपातीची गरज नाही. पण, भविष्यातील परिस्थिती लक्षात घेत याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे संकेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. गंगापूर धरणातील मृतसाठा उचलण्याकरीता व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना केल्या आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे गुरुवारी (दि. २२) जिल्ह्यातील पाणी टंचाईची बैठक घेण्याची शक्यता आहे. (Nashik Water Cut Off cancelled)

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच जिल्ह्यातील पाणी टंचाईचे विदारक चित्र आहे. २४ प्रमुख धरणां मध्ये केवळ २९ हजार ६५ दलघफू म्हणजे ४४ टक्के साठा शिल्लक आहे. तर ५५९ गावे-वाड्यांना १७० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईच्या या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २१) परिस्थितीचा आढावा घेतला. (Nashik Water Cut Off cancelled)

जिल्हाधिकारी शर्मा यांनी नाशिकचा आढावा घेताना सध्या शहरात पाणी कपातीची गरज नाही. पण भविष्यात गरज लक्षात घेता महानगरपालिकेला धरणातून मृतसाठा उचलण्यासाठी व्यवस्था करावी. अशी व्यवस्था केल्यास शहराला अतिरिक्त ४०० दलघफू पाणी उपलब्ध होईल, असे शर्मा म्हणाले. तसेच पाण्याची उपलब्धता व वापर याचा दर महिन्याला आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. दरम्यान, पुढील काळात आवश्यकता भासल्यास किती टक्के कपात लागू करायची हे अद्याप स्पष्ट नसल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत २३ टक्यांनी पाण्याची घट आहे. त्यामुळे उपलब्ध साठा लक्षात घेत पाण्याचा सर्वांनी काटेकोरपणे वापर करत बचत करावी. नियोजनावेळी पाण्याची गरज कमी हाेणार असल्यास त्याबद्दल आधीच कल्पना देण्यात यावी, असे निर्देश शर्मा यांनी यंत्रणांना दिले. तसेच उपलब्ध जलसाठ्यात प्राधान्याने पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यांनतर शेती व औद्योगिक यांचा क्रम नियोजित केला जाईल असेही शर्मा यांनी सांगितले. बैठकीला महसुल, महापालिका, जिल्हा परिषद, जलसंपदासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Nashik Water Cut Off cancelled)

मार्चअखेर ६०० योजना पूर्ण
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या ६०० योजना मार्चपर्यंत पूर्ण होत असल्याबद्दल जलज शर्मा यांनी बैठकीत समाधान व्यक्त केले. धरण-बंधाऱ्यातून गाळ काढणे, नरेगामार्फत जलसंधारणाची कामे, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी उपक्रमांना चालना देऊन पुढील काळात त्याचा टंचाईची तीव्रता कमी करण्यास उपयोग होईल. सिंचनावर काहीअंशी परिणाम होऊ शकतो, असे शर्मा यांनी नमूद केले.

हेही वाचा:

The post पाणीटंचाईचा आढावा : पालकमंत्री घेणार आज बैठक appeared first on पुढारी.