राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांची आज येवल्यात सभा

शरद पवार

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडाळीनंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची पहिलीच जाहीर सभा शनिवारी (दि.8) ना. छगन भुजबळ यांच्या येवल्यात होत आहे. गत वीस वर्षांपासून भुजबळांच्या नावाने ओळखल्या या मतदारसंघात खा. पवार काय बाेलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीतील फुटीमध्ये छगन भुजबळ सत्तेत सामील झाल्याने बहुसंख्य मराठा मतदार असलेल्या येवला- लासलगाव मतदारसंघात संभ्रमाचे वातावरण आहे. या मतदारसंघात शरद पवार यांच्या आग्रहाखातर गेल्या वीस वर्षापासून मतदार भुजबळ यांच्या पारड्यात मतांचे दान टाकत होते. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत भुजबळ विरुद्ध भूमिका घेतल्याने येवल्यात राष्ट्रवादीच्याच माणिकराव शिंदे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. शिंदे हे पवार कुटुंबियांचे विशेषता अजित पवारांचे स्नेही असून केवळ भुजबळांमुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, पक्षातून अजित पवारांसह भुजबळांनी शरद पवारांना ठेंगा दाखवल्याने शरद पवारांसह जयंत पाटील यांनी माणिकराव शिंदे यांच्याबरोबर तात्काळ संपर्क साधून येवल्यात सभा घेण्याचे ठरवले. मागील सारे विसरून माणिकराव शिंदे यांना राष्ट्रवादीमध्ये सामावून घेण्यात आले आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेडमध्ये ही सभा होणार असून या सभेचे नियोजन पूर्ण झाले आहे.

सभेच्या तयारीसाठी केवळ दोन दिवस मिळालेल्या शरद पवार समर्थक माणिकराव शिंदे व अनेक समर्थकाकडून सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या भुजबळांबरोबर असलेले माजी आ. मारोतराव पवार हे सुद्धा या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. सध्या शिवसेनेची जवळीक असलेले आणि गेल्या दोन वर्षापासून भुजबळांशी जवळीक साधून बाजार समिती निवडणूक जिंकणारे आमदार पवार यांचा गट आता शरद पवार यांच्या मागे ठामपणे उभा राहीले आहेत. त्यांनी उघडपणे माणिकराव शिंदे यांच्या घरी भेट घेत पवारांच्या सभेसाठी सहकार्य करणार व उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा : 

The post राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांची आज येवल्यात सभा appeared first on पुढारी.