राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांची शनिवारी येवला येथे पहिली सभा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  शनिवारपासून (दि.८) आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे त्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. पवार हे ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरुन येवल्याच्या दिशेने निघणार आहेत. या दरम्यान ठाणे, भिवंडी, पडघा, शहापूर, इगतपुरी मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचे स्वागत करणार आहेत.

शिवसेनेचे तत्कालीन वजनदार नेते छगन भुजबळ यांचा मुंबईतील माझगाव हा बालेकिल्ला होता. शिवसेनेतून फुटल्यानंतर त्यांनी याच मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. परंतु, शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार बाळा नांदगावकर यांनी त्यांचा पराभव केला होता. मुंबईतून निवडून येण्याची शक्यता नसल्याचे ओळखून त्यांनी नाशिकमधील येवला मतदार संघातून निवडणूक लढवली. विदेशीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसला रामराम करणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar)  यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली. भुजबळही त्यांच्यासोबत आले. शरद पवार यांना मानणारा मराठा मतदार अधिक असल्यामुळे भुजबळ यांचा येवल्यात विजय होत असल्याचे बोलले जात आहे.

आता त्यांनी पवार यांची साथ सोडली आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भुजबळ यांनी पवार यांच्यावर टीका केली होती. पवार यांची पहिली सभा येवला येथे होणार आहे. या सभेतून भुजबळ यांच्या टीके पवार काय उत्तर देणार ? त्यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराची घोषणा करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

येवल्यातील सभेनंतर पवार धुळे आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे ते येवल्याहून मुंबईला परतणार आहेत. आठ दिवसांनंतर ते धुळे आणि जळगाव दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्यापाठोपाठ बीड, अहमदनगर, सोलापूर, पुणेसह इतर जिल्ह्यात त्यांचा दौरा आहे.

हेही वाचा 

The post राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांची शनिवारी येवला येथे पहिली सभा appeared first on पुढारी.