रुग्णसेवा हाच छंद

डॉ. अशोक थोरात www.pudhari.news

नाशिक : गौरव अहिरे

दैनंदिन व्यग्र दिनक्रमात रुग्णांवर उपचार करणे, बीड जिल्ह्यातील रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवणे हा छंदच मला जडला आहे. त्यात दिवसाची सुरुवात व शेवट हा रुग्णसेवेनेच होत असल्याने दिवस सार्थकी लागल्याचा आनंद होतो. त्यामुळे माझ्या नोकरीतूनच छंद जोपासण्यावर भर असल्याचे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी मांडले.

डॉ. थोरात यांनी सांगितले की, मराठवाड्यात शासकीय सेवा बजावताना सर्वाधिक वेळ गेला. त्यामुळे बीड जिल्ह्याशी ऋणानुबंधही घट्ट झाले. रुग्णांवर उपचार करता करता, बीड जिल्ह्याशी नाते घट्ट झाले आणि तेथील रुग्णांचा विश्वास द्विगुणित झाला. शासकीय नोकरी असल्याने बदली झाल्याने मी नाशिकला सेवा बजावत असलो, तरी बीडमधील नागरिक आजही संपर्कात आहेत. तेथील नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी रुग्णसेवेवर भर दिला आहे. अनेकदा ओळखीचे-अनोळखी व्यक्ती मला संपर्क करून वैद्यकीय मदत मागतात. त्यामुळे अशा रुग्णांवर योग्य ठिकाणी उपचार व्हावेत, यासाठी प्रयत्नशील असतो. त्यासाठी संबंधित रुग्णालय – डाॅक्टरांशी संपर्क साधणे, रुग्णांना कोणत्या प्रकारे उपचार आवश्यक आहे, हे जाणून घेत रुग्ण व नातलगांना तशी माहिती देणे, वैद्यकीय खर्च जास्त आल्यास तो कमी करण्यासाठी मदत करणे, आवश्यकतेनुसार रुग्ण, डॉक्टर यांच्यात समन्वय ठेवण्यात मदत करणे यासाठी प्रयत्न करतो.

काही रुग्ण उपचारांसाठी बीडहून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात येतात. त्यामुळे त्यांचा हा विश्वास मी रुग्णसेवेच्या माध्यमातून कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मदत हाच भाव डोळ्यासमोर असल्याने आपण केलेली मदत विसरून जातो. मात्र कालांतराने रुग्ण किंवा त्यांचे नातलग भेटायला येतात किंवा मेसेज, फोनवरून संपर्क साधून आठवण काढतात. त्यावेळी केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद मिळतो. त्याचप्रमाणे तासभर चालणे, योगा करणे याबरोबरच वाचनासाठीही वेळ देतो. जेणेकरून मानसिक, शारीरिक स्वास्थ्य सुदृढ राहते.

शब्दांकन : गौरव अहिरे.

The post रुग्णसेवा हाच छंद appeared first on पुढारी.