वणीच्या सप्तशृंगी गडावर सहा लाखांचा भेसळयुक्त पेढा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अन्न व औषध प्रशासनाने नुकतीच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भेसळयुक्त मिठाई जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर विभागाने वणी, सप्तश्रृंगगडावर मावा पेढ्याच्या नावाखाली विक्री होत असलेल्या तब्बल सहा लाखांचा भेसळयुक्त पेढा जप्तीची धडक कारवाई केली आहे. यामुळे सप्तश्रृंगगड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनातर्फे सध्या धार्मिक स्थळी व चैत्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या यात्रेच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कार्यवाही करण्याबाबतची मोहीम हाती घेतली आहे. प्रशासनाने त्र्यंबकेश्वरनंतर जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणी येथील सप्तश्रृंगगड येथे अन्नसुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, गोपाल कासार, प्रमोद पाटील, उमेश सूर्यवंशी, अ. उ. रासकर यांनी अचानक छापे टाकून तपासणी केली. सप्तश्रृंगगडाच्या रोप वे संकुल परिसरात ग्राहकांची दिशाभूल करून मावा पेढे, कंदी पेढे, मलाई पेढे व कलाकंद पेढे हे दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केले असल्याचे भासवून हलवा, कलाकंद, स्पेशल बर्फी व इतर तत्सम पदार्थ विकत असल्याचे आढळून आले.

कारवाईत अभिषेक पेढा सेंटर येथे दोनशे किलो पेढा व इतर मिलावटी साहित्य जप्त केले. त्याची किंमत ६४ हजार दोनशे रुपये आहे. मयूरी पेढा सेंटर येथे २९८ किलो पेढ्याची किंमत दोन लाख ६९ हजार चारशे रुपये आहे. मयूर पेढा सेंटर येथे ५३ किलो माल जप्त केला आहे. त्याची किंमत १६ हजार पाचशे रुपये आहे. भगवती पेढा सेंटर येथे ५९५ किलो माल जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत एक लाख ७७ हजार सहाशे रुपये आहे. मे. भगवती पेढा सेंटर येथे १८७ किलो मला जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत ५६ हजार शंभर रुपये आहे. असा एकूण १९४४ किलो भेसळयुक्त पेढा, मलई पेढा नष्ट करण्यात आला आहे. या भेसळयुक्त पेढ्याची किंमत ५ लाख ८३ हजार ८०० रुपये इतकी आहे.

हेही वाचा –