वाटा विकासाच्या : खुर्सापार पॅटर्न म्हणजे अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील विकासाचे द्योतकच

खुर्सापार पॅटर्न www.pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे
नागपूर जिल्ह्यातील काटोल हा अभयारण्य आच्छादित तालुका, राज्याच्या उत्तर सीमेवर असलेला हा तालुका म्हणजे पेंच अभयारण्यच होय. या तालुक्यातील उत्तरेकडील सर्वांत टोकाचे गाव म्हणजे खुर्सापार. पेंचव्याघ्र प्रकल्पात येणार्‍या मानसिंगदेव अभयारण्यातील अवघी 1400 लोकसंख्या असलेल्या खुर्सापार ग्रामस्थांना राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत लाभ झाला आहे. अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील विकासाचे द्योतक म्हणून या गावाचे नाव समोर येते.

पंचायत राज विभागाकडून प्रकाशित ‘बेस्ट प्रॅक्टिसेस टू फाइट कोव्हिड-19 बाय पंचायत ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तिकेत महाराष्ट्रातील सहा ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत म्हणून खुर्सापारचा उल्लेख होतो. श्रीनगर-कन्याकुमारी हायवेपासून साडेसहा किलोमीटर अंतरावरील खुर्सापार या गावात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेंतर्गत 48 कुटुंबांना एलपीजी कनेक्शन दिले आहे. याशिवाय सोलर पथदिवे, 16 स्वच्छतागृहे, गावातील तरुणांना रोजगार, तलाव खोलीकरण, गुरांकरिता गोठे अशी विविध कामे करण्यात येत आहेत. या योजनेमुळे गावातील अवैध वृक्षतोड, बेकायदा मासेमारी, वन्यप्राण्यांची शिकार करणे बंद झाले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे मानसिंगदेव अभयारण्यातील खुर्सापार गावामध्ये कायापालट झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये राहणार्‍या गावकर्‍यांचे व आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गावकर्‍यांना ई-लर्निंग, एल.पी.जी कनेक्शन, दुभत्या गायी, सोलर पंप, स्वच्छतागृह, उघड्या विहिरींना संरक्षक भिंती सोबतच गावकर्‍यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. गावातून पर्यटकांना हॉटेल्स, जंगल सफारीसाठी मार्गदर्शक, जंगल सफारी जिप्सी चालक मालक, पर्यटकांना राहण्याची सुविधा, विविध स्टॉल्स अशा अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून ग्रामविकास व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात वनविभाग मदत करीत आहे. हागणदारीमुक्त म्हणून घोषित असलेल्या या गावाने स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले असून, वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. कोरोना कालावधीत हात धुण्याचे महत्त्व, नियमित शौचालय वापरण्याचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन स्वच्छता अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

असा आहे खुर्सापार पॅटर्न…
* पहिल्या दिवसापासून उपाययोजनांना सुरुवात
* युवकांची वॉर्डनिहाय कोविडयोद्धा म्हणून नियुक्ती
* शासकीय आणि सार्वजनिक इमारतींना सॅनिटायझर सेन्सॉर मशीन
* चौकात सीसीटीव्ही कॅमेरे * बाहेरील लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी होमगार्ड
* लाउडस्पीकरद्वारे कोरोनाविषयी जनजागृती
* सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क अनिवार्य.

हेही वाचा:

The post वाटा विकासाच्या : खुर्सापार पॅटर्न म्हणजे अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील विकासाचे द्योतकच appeared first on पुढारी.