विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट

treks www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ

ट्रेकिंग स्वत:ला ओळखण्याचा एक विलक्षण अनुभव देतो. यामुळे माणसाला स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा मिळते. ‘ये जवानी है दिवाना’ सिनेमात दाखवण्यात आलेल्या ट्रेक कॅम्पनंतर ट्रेकिंगची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली. पण, ट्रेक करणे एवढे सोपे नसते त्यासाठी शरीराबरोबर मनाची तयारी करावी लागते. इतर पर्यटनांपेक्षा ट्रेकिंग पूर्णपणे वेगळे असते. इथे हॉटेलमध्ये जाऊन घरासारखे राहता येत नाही तर टेण्टमध्ये रहावे लागते. त्यामुळे बरेच सामान सोबत बाळगावे लागते. सोपे, मध्यम आणि कठीण असे तीन प्रकारचे ट्रेक असतात. ८ ते १० हजार फूट असणारा ट्रेक सवयीने चढता येतो, तर १५ हजार फुटांपेक्षा जास्त असणारा ट्रेक चढणे चॅलेजिंग असते. हिमाचल प्रदेशात २३ तर उत्तराखंडमध्ये १० ट्रेक पॉइंट आहेत.

१) छोट्या ट्रेकपासून सुरुवात
ट्रेकिंगचा अनुभवच नसताना थेट हिमालयात ट्रेकिंगला जाता येत नाही. त्यासाठी आधी परिसरातील छोट्या टेकड्या, डोंगरापासून ट्रेकला सुरुवात करावी लागते. यामुळे शरीराचा एक अंदाज येतो.
२) बॅग पॅकिंग
ट्रेकला जाताना छोटा संसार सोबत न्यावा लागतो. सोबत असणारी सॅक त्यामध्ये मुबलक पाणीसाठा, औषध, ग्लुकॉन डी, नॅपकीन, गाॅगल, काठी, टॉर्च, कपड्यांचा एक्ट्रॉ जोड या सर्व गोष्टी सोबत ठेवाव्या लागतात.
३) कपडे शूजची निवड
कपडे परिधान करताना सुती कॉटनचे, आरामदायी कपडे घालावे लागतात. फॅशन किंवा पिकनिक समजून जीन्स, तंग कपडे घालता येत नाही. शूज निवडतांना फार टाइट नाही आणि लूझ नाही अशा शूजची निवड करावी लागते.
४) संभाव्य धोके
ट्रेकिंग परिसरातील हवामान, संभाव्य धोके, लुटमारीची शक्यता, मधमाशांचे मोहोळ, जंगली जनावरे या सर्व परिस्थितीचा आधी अभ्यास करावा लागतो. अडीअडचणीच्या वेळी काय करता येऊ शकते याचा अंदाज बांधावा लागतो.
५) महिलांनी सोबत ठेवायच्या गोष्टी
सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यास इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. शिवाय हवामान पाणी बदलामुळे स्कीन अॅलर्जी होऊ शकते अशावेळी डस्टीन पावडर, सॅनिटरी पॅड, हॅण्ड सॅनिटायझर, डिस्पोजेबल इनरवेयर, सेफ्टीपीन अशा गोष्टी सोबत बाळगाव्या.
६) अट्टाहास नको

ट्रेक पूर्ण करण्याचा अट्टाहास टाळून शरीराविरुध्द वागण्याचा प्रयत्न करू नये. विश्रांती घेतल्यानंतर बरं वाटत असेल तरच पुढची वाट पकडावी. नाहीतर सरळ माघारी फिरावे.

७) शरीराबरोबर मनाची तयारी

ट्रेक दरम्यान आयत्यावेळी काहीही घडू शकते. केलेले प्लॅनिंगनुसारच होईल याची खात्री नसते. कधी आयत्या वेळी निर्णय बदलावे लागतात त्यासाठी शरीराबरोबर मनाची कणखर तयारी ठेवावी.

८) मोबाइलवर अवलंबून राहता येत नाही.

उंचावर गेल्यानंतर मोबाइलला नेटवर्क मिळेल याची शक्यता फार कमी असते. मॅपवर अवलंबून न राहता झाडांवर खूणा करून ठेवणे, एखादी निशाणी लक्षात ठेवणे किंवा स्थानिक गाइड सोबत घेणे. शक्यतो एकट्याने ट्रेक करण्याचे टाळून ग्रुपबरोबर ट्रेकिंगचा आनंद घ्यावा.

ट्रेकिंगसाठी सहा महिने अगोदर तयारी करावी लागते. प्रोटिन्स, शरीरातील पाण्याची पातळी, वजन, स्टॅमिना, श्वास घेण्याची पध्दत या सर्व बारीक सारीक गोष्टींचा सराव करावा लागतो. बदलत्या वातावरणानुसार शरीर तयार असावे लागते त्याची तयारी करावी लागते. १० ते १५ वयोगटापुढील मूल ट्रेकिंग करू शकतात. – वसुधा पाटील, ट्रेक आयोजक

The post विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट appeared first on पुढारी.