व्हाट्सॲपवर तक्रार करण्याचे पोलिसांचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये एमडीचे पाळेमुळे पूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी शहर पोलिसांनी नियोजन सुरू केले आहे. शहर ‘ड्रग्ज फ्री’ (Drug Free Nashik) करण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना माहिती द्यावी, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलिसांच्या ९९२३३२३३११ या व्हॉट्सॲपवर तक्रार (Complain on WhatsApp) केल्यास किंवा माहिती दिल्यास संबंधित ठिकाणी, व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.

शहर पोलिसांनी एमडी तयार होणारे कारखाने, गोदामांवर कारवाई करीत कोट्यवधी रुपयांचे एमडी जप्त केले. तसेच ड्रग्ज पेडलरविरोधातही गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड केली आहे. तरीदेखील शहरातील अमली पदार्थांचा विळखा कमी होत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून अद्याप कारवाई सुरू असून, काही संशयित ड्रग्ज विक्री करताना समोर येत आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

‘ड्रग्ज फ्री नाशिक’ (Drug Free Nashik) ही मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी नाशिककरांनी पोलिसांचे खबरी होत ड्रग्ज पुरवणाऱ्यांची माहिती द्यावी, गुन्ह्यांची उकल करण्यात नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा पोलिसांनी केली आहे. शहर पोलिस एमडी, गांजा व इतर प्रकारचे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची धरपकड करीत आहेत. मात्र, अनेकदा संशयितांची माहिती मिळवण्यात किंवा त्यांचा शोध घेण्यात अडचणी येतात. त्यामुळे नागरिकांकडून माहिती मिळाल्यास संशयितांवर कारवाई करण्यास मदत होईल या हेतूने पोलिसांनी नागरिकांना आवाहन करीत या मोहिमेत सहभागी होण्यास सांगितले आहे.

पेडलरवरील कावाईत वाढ होण्याची अपेक्षा
आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Task Force) कार्यरत आहे. या पथकातर्फे फेब्रुवारीपर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अंबड, सातपूर, देवळाली कॅम्प या पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नागरिकांकडून माहिती मिळाल्यावर या कारवाईंमध्ये वाढ होईल, असा विश्वास पोलिस वर्तवत आहे. (Drug Free Nashik)

The post व्हाट्सॲपवर तक्रार करण्याचे पोलिसांचे आवाहन appeared first on पुढारी.