शिवजन्मोत्सव – 2023 : सिन्नरला उद्यापासून तीन दिवस भरगच्च कार्यक्रम; चित्ररथ, थरारक प्रात्यक्षिकांसह मिरवणूक

शिवाजी महाराज

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शहर परिसरात शिवजयंती उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमार्फत सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या सहा वर्षांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षीपासून शहरात संयुक्तरीत्या शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे. येथील शासकीय विश्रामगृहावर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपिठावर उपाध्यक्ष राजेंद्र जगझाप, सुभाष कुंभार, हरिभाऊ तांबे, भाऊसाहेब पवार, रवी मोगल, भाऊसाहेब शिंदे, दत्ता वायचळे, भारत सोनवणे, समर्थ चोथवे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन असे…
शिवजन्मोत्सवानिमित्त शुक्रवार (दि. 17) ते रविवारपर्यंत (दि. 19) तीन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार सायंकाळी आडवा फाटा येथे शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि.18) सायंकाळी साडेसहा वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते व इतिहासाचे अभ्यासक प्रा. सोमनाथ गोडसे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजता आडवाफाटा येथून भव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.  मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचिरत्रावरील विविध प्रसंग सादर करणारे सजीव देखाव्यांचा यात समावेश आहे. चित्ररथ, लेजीम पथक, झेंडा पथक, झांज पथक, ढोल पथकांचाही मिरवणूकीत सहभागी होणार आहे. पथकांसोबतच सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते सामील होणार असल्याचे वारुंगसे यांनी सांगितले. आडवा फाटा येथून मिरवणूक सुरु झाल्यानंतर बसस्थानक, महात्मा फुले पुतळा, नेहरू चौक, नाशिकवेस, लाल चौक, शिंपी गल्ली, गणेश पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वावी वेस मार्गे डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाजवळ मिरवणुकीचा समारोप होईल. मिरवणूक मार्गावर सडा-रांगोळी करण्यात येणार आहे. नागरिकांनी पुष्पवृष्टी करण्याचे आवाहन शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

डीजे, फटाकेविरहित मिरवणुकीचा संकल्प…
चित्ररथ पथके, विविध वेशभूषेतील तरुण व तरुणींचा सहभाग, ऐतिहासिक प्रसंगावरील देखावे, भजनी-गोंधळी मंडळाचा सहभाग, तलवारबाजी व इतर तीन पथकांचे प्रात्यक्षिके, मल्लखांब प्रात्यक्षिके, मानवी मनोरे, अश्वारूढ विविध वेशभूषेतील महापुरुष, डीजेविरहित तसेच फटाकेविरहित मिरवणूक, महिलांचा लक्षणीय सहभाग, आदिवासी नृत्यपथक व योगासने प्रात्यक्षिके होणार आहेत. युवतींची स्कूटी रॅलीही काढण्यात येणार असल्याची माहिती समितीने पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा:

The post शिवजन्मोत्सव - 2023 : सिन्नरला उद्यापासून तीन दिवस भरगच्च कार्यक्रम; चित्ररथ, थरारक प्रात्यक्षिकांसह मिरवणूक appeared first on पुढारी.