शिवप्रेमींसाठी यंदा प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

देखावा देवळाली pudhari.news

नाशिक (देवळाली कॅम्प): पुढारी वृत्तसेवा
भगव्या पताकांसह आकाशकंदिल आणि भव्य विद्युत रोषणाईने देवळाली कॅम्प शहर उजळून निघाले असून, येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यावर्षी प्रथमच ६० फुटी भव्य किल्ल्याची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे. सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने यावर्षी प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी शिवप्रेमींसाठी आयोजित करण्यात आली असून, तमाम शिवप्रेमी नागरिकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य गोडसे, कार्याध्यक्ष प्रशांत कोकणे आदी पदाधिकाऱ्यांनी केले.

देवळालीतील जुन्या बसस्थानक परिसरात उभारलेल्या भव्य देखाव्याजवळ छत्रपतींच्या मूर्तीची स्थापना, तर रविवारी (दि. १८) सायंकाळी ६ ते ८ वा. दरम्यान सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रसाद ओक, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आदी कलाकारांचा संच सुप्रसिद्ध ‘हास्यकल्लोळ’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. सोमवारी (दि. १९) साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सकाळी ९ वा. संसरी नाका ते जुने बसस्थानकादरम्यान पारंपरिक मार्गावर भव्य शिवपालखी सोहळा व मलखांब प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे. यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात साकारलेल्या ६५ फूट रुंद, ५५ फूट उंचीच्या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे मान्यवरांच्या उपस्थितीत शिवपूजन व महाआरती, त्यानंतर महाप्रसाद वाटप तर सांयकाळी ६:३० वा.फटाक्यांची आतषबाजी व सांयकाळी ७:३० वा पुन्हा शिवमहाआरती अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे.

लॅम रोडवर राज्याभिषेक महाल
लॅम रोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. समितीतर्फे वेशभूषा स्पर्धा, १९ तारखेला मान्यवरांच्या हस्ते पूजन, सायंकाळी महाप्रसाद, तर सायंकाळी पारंपरिक वेशभूषेत महिलांच्या हस्ते महाआरती व १५१ सभासदांना मोफत अपघाती विमा वाटप करण्यात येणार आहे. यादिवशी प्रसूत होणाऱ्या मातांना पाच हजार रुपये रोख वाटप करणार आहे.

हेही वाचा:

The post शिवप्रेमींसाठी यंदा प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी appeared first on पुढारी.