श्रीराम भूमितून उद्धवसेना फुंकणार लोकसभेचा बिगुल

संजय राऊत,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा;  देशात अन् राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे वातावरण रंगायला सुरुवात झाली असून, सर्वच पक्षांकडून त्यादृष्टीने मोटबांधणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये २३ जानेवारी रोजी आयोजित महाशिबिरात लोकसभेचे बिगुल फुंकले जाणार आहे. श्रीरामाच्या भूमितून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीचे बिगूल फुंकले जावे, अशी श्रद्धा आणि भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

येत्या २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे महाशिबिर आयोजित केले असून, त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल अर्धा डझन नेत्यांनी रविवारी (दि. २४) नाशिकमध्ये हजेरी लावली होती. खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, माजी मंत्री सुभाष देसाई, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सुरज चव्हाण, सुप्रदा थातरपेकर आदी नेत्यांनी महाशिबिराचा आढावा घेतला. यावेळी उपनेते सुनील बागूल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार योगेश घोलप, माजी महापौर विनायक पांडे, माजी नगरसेवक विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, गणेश धात्रक, नितीन आहेर आदी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत हॉटेल एक्स्प्रेस इन येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत महाशिबिराबाबतच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या. तसेच हॉटेल डेमोक्रॅसी येथे महाशिबिर तयारीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा केला. तसेच महाशिबिरानिमित्त आयोजित खुल्या अधिवेशनानिमित्त हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेबाबतची देखील नेत्यांनी माहिती घेतली. शिबिरासाठी राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याने त्याचे सुक्ष्म नियोजन करण्याबाबत काही समितीत्याही गठीत केल्या गेल्या.

शिवसेना फुटीनंतर प्रथमच ठाकरे गटाकडून अशाप्रकारचे शिबिर आयोजित केले गेल्याने, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये हुरूप आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या शिबिरात निवडणूकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून या महाशिबिराचे सूक्ष्म नियोजन केले जात असून, पक्षातील बडे नेतेही याकडे लक्ष ठेवून आहेत.

रामाच्या भूमीतून सत्याचे युद्ध

श्रीरामाच्या भूमीतून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकणार आहेत. राम-रावण सत्याचे युद्ध याच भूमीतून व्हावे, अशी श्रद्धा आणि भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. पंचवटीतून या लढाईला सुरुवात केली जाणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी याप्रसंगी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post श्रीराम भूमितून उद्धवसेना फुंकणार लोकसभेचा बिगुल appeared first on पुढारी.