सिटीलिंकचा संप अखेर मागे, वाहकांचे जानेवारीचे वेतन दिले

city link bus strike nashik www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– वाहक पुरवठादार ठेकेदाराने संपकरी वाहकांचे जानेवारी महिन्याचे वेतन त्यांच्या बँक खात्यावर जमा करत डिसेंबरचे थकित वेतनही आठवडाभरात अदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वाहकांनी पुकारलेला सिटीलिंकचा संप सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आला. शनिवारपासून सिटीलिंकची बससेवा पुर्ववत होण्याची शक्यता

वाहक पुरवठादार ‘मॅक्स डिटेक्टिव्ह अॅन्ड सेक्युरीटीज’ या दिल्लीस्थित ठेकेदार कंपनीच्या आठमुठेपणामुळे सिटीलिंकला वारंवार संपाला सामोरे जावे लागले आहे. ठेकेदाराकडून नियमित वेतन न मिळणे, अपुरे वेतन, ग्रॅच्युएटी व भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा न करणे, दिवाळी बोनस, कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक दंडात्मक कारवाई अशा विविध कारणांमुळे वाहकांनी आतापर्यंत आठ वेळा संप पुकारला आहे. महापालिकेने वेतनासाठी डिसेंबरचे आगाऊ देयक अदा करूनही ठेकेदाराने वाहकांचे दोन महिन्यांचे वेतन थकविल्याने सिटीलिंकच्या तपोवन डेपोतील वाहकांनी गुरूवारी (दि.२९) अचानक संप पुकारला होता. तपोवन डेपोतील वाहकांच्या संपामुळे जवळपास दीडशे सिटीलिंकच्या बसेस डेपोतून बाहेर न पडल्याने प्रवाशांना दोन दिवस मनस्ताप सहन करावा लागला. तर नाशिकरोड डेपोसाठी नवीन ठेकेदार नियुक्त केल्यामुळे या डेपोतील १०० बसेसची सेवा मात्र सुरू होती. शुक्रवारी महापालिकेने ठेकेदाराला जानेवारी महिन्याचे वेतन अदा केले. त्यानंतर ठेकेदाराने वाहकांच्या खात्यात सांयकाळ पर्यंत वेतन जमा करण्यास सुरूवात केली. तर डिसेंबर महिन्यात १३० वाहकांचे वेतन थकले असून त्यांचेही वेतन आठ दिवसात देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सायकांळी वाहकांनी संप मागे घेतला आहे. त्यामुळे शनिवार पासून ही बससेवा पूर्ववत होणार असल्याचा दावा पालिकेने तसेच मक्तेदाराने केला आहे.

ठेकेदाराला पुन्हा १५ लाखांचा दंड

ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे वाहकांनी संप पुकाराल्याने गुरूवारी व त्यानंतर शुक्रवारी सिटिलिंकच्या तपोवन डेपोतील दीडशे बसेसच्या ३५ मार्गावरील सुमारे चार हजार फेऱ्या बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. यामुळे सिटिलिंकला मोठा तोटा झाला आहे. नियमानुसार ठेकेदाराला १५ लाखांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post सिटीलिंकचा संप अखेर मागे, वाहकांचे जानेवारीचे वेतन दिले appeared first on पुढारी.