सीटूच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकार कामगारविराेधी चार श्रमसंहिता रद्द करून सर्व कामगार कायदे पुनर्स्थापित करावे. तसेच त्यांची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी नाशिकमधील शेकडो कामगार शुक्रवारी (दि. १६) रस्त्यावर उतरले. कामगार-कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य माेर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू), नाशिक जिल्हा रिक्षा-टॅक्सीचालक-मालक संघटना, संयुक्त किसान मोर्चा, एमएसएमआरए संघटना अशा विविध संघटनांनी एकत्र येत कामगार-कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनात औद्योगिक कामगारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. साडेपाच हजार उद्योगांपैकी बहुतेक सर्व उद्योगांमध्ये ७० टक्केपेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करत आहेत. हंगामी, टेम्पररी, ट्रेनी अप्रेंटिसच्या नावाखाली तरुणांचे शोषण सुरू असल्याची व्यथा निवेदनातून मांडण्यात आली. तसेच कामगारांना किमान २६ हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे, म्हातारपणाच्या पेन्शनची व्यवस्था झाली पाहिजे, मोफत घर बांधून मिळाले पाहिजे, मोफत शिक्षण व आरोग्याची सोय करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

हुतात्मा कान्हेरे मैदान येथून मोर्चाला प्रारंभ झाला. पुढे जिल्हा परिषदमार्गे शालिमार, नेहरू गार्डन, रेडक्रॉस सिग्नल, एमजी रोडमार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. माेर्चात सीटूचे अध्यक्ष सीताराम ठोंबरे, डॉ. डी. एल. कराड, अ‍ॅड. तानाजी जायभावे, देवीदास आडोळे, राजू देसले, अरुण आहेर, दिनेश वाघ, महादेव खुडे यांच्यासह कामगार सहभागी झाले.

या आहेत मागण्या

– कंत्राटी, हंगामी, ट्रेनी, वायएसएफ, एफटीसी कामगार कायम करावे

– ३५ उद्योगांतील कामगारांची किमान वेतनात सुधारणा करावी

– दरमहा किमान २६ हजार इतके वेतन द्यावे

– सातपूरच्या एम. जी. इंडस्ट्रिजच्या कामगारांना वेतन, प्राेव्हिडंट फंड द्यावे

– सागर इंजिनिअरिंगकडील कामगारांची थकीत रक्कम द्यावी

– अंबडच्या मे. नाशिक फोर्जमध्ये कामगारांना थकीत वेतन, भरपाई द्यावी

– वीर इलेक्ट्रो इंजिनिअरिंगमधील कामगारांचे थकीत वेतन मिळावे

– सर्वच तालुक्यात ईएसआयसी हॉस्पिटल सुरू करावे

– अंबडच्या अनिल प्रिंटर्स, श्याम इलेक्ट्रोमेक कंपनीतील कामगारांना पूर्ववत रुजू करावे

– सातपूरच्या ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये रिक्त पदांची भरती करावी

– सिन्नर, इगतपुरी नगरपालिका, मालेगाव मनपाच्या सफाई व घंटागाडी कामगारांना किमान वेतन द्या.


हेही वाचा :

The post सीटूच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा appeared first on पुढारी.