सुधीर तांबे यांचे निलंबन, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय; पक्ष करणार चाैकशी

सुधीर तांबे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींनी निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या मान्यतेने पक्षाच्या शिस्तपाल समितीने ही कारवाई केली आहे. शिस्तभंग प्रकरणी तांबेंविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

अवघ्या राज्यात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी पुत्र सत्यजित यांच्या हट्टापुढे झुकत अखेरच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. कॉंग्रेसचा एबी फॉर्म असतानाही डॉ. तांबे यांनी केलेल्या गद्दारीमुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपला हाताशी धरून तांबे पिता-पुत्रांनी खेळलेल्या राजकीय खेळीमुळे निवडून येणारी हक्काची जागा गमवावी लागण्याची वेळ कॉंग्रेसवर ओढावल्याची चर्चा आहे. तर कॉंग्रेस पक्षाअंतर्गत तांबेंनी फसवल्याची भावना बळावली आहे. तसेच या सर्व प्रकरणी कारवाईचे संकेतही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. अखेर काँग्रेसने रविवारी (दि.१५) डॉ. तांबे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. तसेच तांबे यांची पक्षाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदानाआधी तांबे पिता-पुत्रांसाठी हा धक्का मानला जात आहे.

तांबेंचे ‘वेट ॲण्ड वॉच’

कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईबाबत पत्रकारांनी डॉ. सुधीर तांबे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तांबे यांनी चाैकशी होईपर्यंत थांबू, असे स्पष्ट केले. तसेच भाजपमधील प्रवेशाची चर्चा सुरू असल्याबद्दल तांबे यांना विचारले असता चर्चा अनेक चालू असतात. पण त्यात काही तथ्य नाही, असे सांगत या विषयावर अधिकचे भाष्य टाळले. निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिल्याचे विचारले असता तांबेंनी त्यावर ‘नो कमेंटस‌्’ म्हणत या विषयाला बगल दिली.

हेही वाचा : 

The post सुधीर तांबे यांचे निलंबन, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय; पक्ष करणार चाैकशी appeared first on पुढारी.