Dhule : पिंपळनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल १६ गोवंशांना जीवदान

पिंपळनेर,www.pudhari.news

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल १६ गोवंशांना जीवदान मिळाले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेताच दुसरी मोठी कारवाई केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पारधी यांना अवैधरित्या गोवंशांची वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळाली होती. या महितीवरून पिंपळनेर पोलिसांनी कारवाईसाठी पथक तयार केले. पथक पिंपळनेर ते नवापुर रोडवर मळगांव गावाजवळ काळंबा फाटा येथे थांबले असता रात्री २ वाजेच्या सुमारास नवापुर कडुन टाटा कंपनीचे आयशर वाहन क्रमांक एम एच ०४ ई एल ४५३३ येतांना दिसले. या वाहनाला पोलिसांच्या पथकाने रस्त्याच्या कडेला थांबवून पाहणी केली असता ट्रकच्या बॉडी मध्ये वरील बाजुस भुसा भरलेल्या गोण्या रचलेल्या दिसल्याने तसेच वाहनावरील चालक हा पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने त्याबाबत पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

भुसा भरलेल्या गोण्या बॅटरीच्या उजेडात बाजुला करून ट्रकची कसून तपासणी केली असता वाहनात गायी व गो-हे निर्दयतेने, दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी वाहतुक करुन घेवून जात असल्याचे आढळले. या कारवाईत २ लाख ७१ हजार किंमतीचे १६ गोवंश जनावरे तसेच ३ लाख ५० हजार किंमतीची एक टाटा कंपनीची आयशर ट्रक असा एकुण ६ लाख २१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला. १६ गोवंश जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post Dhule : पिंपळनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल १६ गोवंशांना जीवदान appeared first on पुढारी.