Dhule Sakri : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे? 

पिंपळनेर शाळा,www.pudhari.news

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्यामुळे सात शिक्षकांच्या जागा रिकाम्या असल्याने तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी पालक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

यामध्ये शासन नियमानुसार असणारे शिक्षकाचे सात पद रिक्त आहे. त्यामुळे पहिली ते चौथी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी ग्रामस्थांसह विद्यार्थी वर्गातून जिल्हा परिषद प्रशासनाला वेळोवेळी मागणी केली जात आहे, तरीही कायम स्वरूपी शिक्षक उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ व पालकांमध्ये प्रशासनाविषयी संतापाची भावना आहे. याठिकाणी पहिली ते चौथी पर्यतचे वर्ग आहेत. एकुण ३४२ हून अधिक विदयार्थी शिक्षण घेतात. प्रत्येक इयत्तेची संख्या ९० पेक्षा जास्त आहे. प्रत्येक इयत्तेच्या दोन तुकड्या आहेत. अशा एकूण आठ तुकड्या आहेत. या शाळेवर एकूण १२ शिक्षकांची पद मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात चार शिक्षक व एक मुख्याध्यापक असे पाच शिक्षक शाळा चालवतात. अजून सात शिक्षकांची मागणी पालकांकडून होत आहे.

शिक्षकांवर अध्यापन व शालेय कामकाजाचा अतिरिक्त भार पडत असतो. शाळेचे दैनंदिन कामकाज, शालेय पोषण आहार, मासिक पत्रके, सातत्याने सुरू असणारी ट्रेनिंग, चौथीच्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले देणे व पहिलीच्या विद्यार्थ्यांना दाखल करून घेणे इत्यादी कामे चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवावे ही सांभाळावे असा प्रश्न शिक्षकांपुढे उभा असून एका शिक्षकाला दोन वर्ग सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेतून काढून घेत खासगी शाळेत दाखल करत आहेत. यामुळे शाळेत लवकरात लवकर शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी ग्रामपंचायत तसेच विद्यार्थी-पालक वर्गाकडून करण्यात आली आहे.

■आमच्या पाल्यांना प्रत्येक विषय शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून द्यावेत-सुरज खांडेकर, पालक

■आम्ही शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी मागणी केली आहे. लवकर शिक्षक उपलब्ध करून देऊ असे आम्हाला साक्री पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
वकील थोरात.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष

■शिक्षण विभागाकडे तसेच सि.ओ यांच्याकडे सातत्याने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मागणीप्रमाणे एक शिक्षक उपलब्ध झाले असून उर्वरित सात शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.- पोपटराव सोनवणे
जिल्हा परिषद सदस्य

■साक्री तालुक्यात ज्या शाळेत शिक्षक पद रिक्त आहेत, अशा शाळांना 30 जून पर्यंत शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षण अधिकारीसाहेंबाना केली असून त्यासंदर्भात लवकरच कार्यवाही करून शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत-
राजेंद्र आनंदा पगारे गटशिक्षणाधिकारी साक्री पंचायत समिती.

हेही वाचा :

The post Dhule Sakri : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे?  appeared first on पुढारी.