नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पशुपालक, शेतकरी आणि जनावरांचे व्यापारी यांना आता पशुधनाच्या ‘ईअर टॅगिंग’कडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार १ एप्रिल २०२४ नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही. १ जून २०२४ पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावांतील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केला आहे. यामुळे बेकायदा कत्तलींनादेखील आळा बसणारा असणार आहे.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे “नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली’ कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोड) च्या नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. थोडक्यात, या प्रणालीवर संबंधित पशुधनाचे प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू, इ. सर्व माहिती उपलब्ध होते. त्याकरिता सर्व पशुधनास कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थेमार्फत पशुधनास कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे, जेणेकरून पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांना पशुधानाचे ईअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक आहे. १ जून २०२४ नंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था/दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. तसेच कत्तलखान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. तसेच नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसानभरपाईची रक्कम देय होणार नाही. कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही, तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
परराज्यातील पशुधन ठरणार अपवाद
परराज्यातून येणाऱ्या पशुधनास ईअर टॅगिंग केल्याची व त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी करावी. बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही.