Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४ हजार १२७ कोटींची गरज

कुंभमेळा नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Kumbh Mela 2027) साधुग्राम तसेच अन्य सुविधांसाठी आणखी ३५४ एकर जागेची गरज असून, ही जागा संपादीत करण्यासाठी सुमारे ४ हजार १२७ कोटींची मनपाला गरज आहे. एवढी मोठी रक्कम मनपाकडे नसल्याने त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे मागणी केली जाणार असून, त्याअनुषंगाने अहवाल तयार करण्याचे काम मनपाने सुरू केले आहे.

येत्या २०२६-२७ (Kumbh Mela 2027) मध्ये नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू झाले आहे. तपोवनातील २६४ एकर जागेवर साधुग्रामचे आरक्षण आहे. १७ एकर जागा पार्कींग व अग्निशमन दलासाठी आरक्षित आहे. सद्यस्थितीत ५४ एकर जागा महापालिकेने गत सिंहस्थकाळात प्रत्यक्ष वाटाघाटीद्वारे तसेच टीडीआरच्या माध्यमातून संपादित केलेली आहे. सुमारे साडेतेरा एकर जागेच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. पुढील नियोजनाचा भाग म्हणून किती जागा संपादीत करावी लागणार याबाबत अंदाज घेतला जात असून, त्यासाठी लागणाऱ्या निधीबाबत शासनाकडे मागणी केली जाणार आहे. मनपाच्या अंदाजपत्रकात भूसंपादनासाठी अडीचशे तीनशे कोटींची तरतूद आहे. त्यामुळे ४१२७ कोटी उभे करण्याकरता मनपा केंद्राकडे मागणी करणार आहे.

बाह्य आणि अंतर्गत रिंगरोडसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. प्रोत्साहनपर (इन्सेन्टिव्ह) टीडीआरच्या माध्यमातून जागा संपादीत करता येणे शक्य आहे. गेल्यावेळी कुंभमेळ्यानंतर साधूग्रामसाठी जागा अधिग्रहीत करण्यासाठी अडीच पट टीडीआर देण्याची योजना आणली होती. परंतु, रेडीरेकनरचा दर अत्यंत कमी असल्यामुळे या प्रस्तावाला जागा मालकांनी पाठ दाखवली होती. त्यामुळे यावेळी देखील चारपट टीडीआर जाहीर केला तरी त्यास प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे.

हेही वाचा :

The post Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४ हजार १२७ कोटींची गरज appeared first on पुढारी.