Loan fraud : विनातारण कर्जाच्या नावाने महिलेला पंधरा लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

क्रेडिट सोसायटीतून विनातारण ४० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून सहा जणांनी नाशिकरोड परिसरातील महिलेला तब्बल साडेपंधरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

या महिलेचा आय.बी.टी. इंटनॅशनल ब्यूटी अकॅडमी हा व्यवसाय असून, तिला व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज हवे होते. तिच्या पतीचा मित्र श्रीपाल जैन हा फायनान्स व लोन मिळवून देण्याचे काम करतो. त्याला ही माहिती दिली असता, त्याने मुंबईतील कार्यालयामध्ये फिर्यादी महिला, तिचे पती, सासरे यांना बोलावले होते. तयावेळी सुमित जैनने, तुम्हाला 10 दिवसांत ओमसाई को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.कडून ४० लाख रुपये अनसिक्युअर लोन मंजूर करून देण्याची बतावणी केली होती. त्यासाठी पाच लाख रुपये कमिशन लागेल असेही सांगितले होते. त्यानंतर त्याने बोरिवली येथे नेले. तिथे सोसायटी चेअरमन संशयित रजनी रजन देशपांडे ऊर्फ रजनी सागर पंडित या भेटल्या. त्यांनी, तुम्हाला लोन देऊ पण त्यासाठी सोसायटीमध्ये 10 लाख रुपये फिक्स डिपॉझिट ठेवावे लागेल तसेच एक टक्का बँकेची प्रोसेसिंग फी लागेल, असे सांगितले होते. त्यासाठी सारस्वत बँकेच्या दहिसर शाखेचा खाते क्रमांक दिला व त्यावर फिक्स डिपॉझिटची रक्कम भरण्यास सांगितले होते.

त्याचबरोबर ६५ हजार ५०० रुपये वेगवेगळे चार्जेसही आकारले होते. दि. ५ एप्रिलला संशयित अशोक शिवाप्पा पुजारी व संतोष दुबे हे दोघे नाशिक येथे ब्यूटी अकॅडमी पाहणीस आले होते. त्यावेळी हजार रुपये व्हेरिफिकेशन चार्जेस घेतले होते. तसेच तुमच्या खात्यावर ९ एप्रिलपर्यंत ४० लाख रुपये जमा होतील, अशी बतावणी केली होती. मात्र, पैसे जमा होत नसल्याने फिर्यादी महिलेने रजनी देशपांडे व अशोक पुजारी यांना संपर्क साधला. मात्र फंड उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच दमबाजीही होऊ लागल्याने संबंधित महिलेने रजनी देशपांडे, अशोक पुजारी, सुमित जैन, गंगाधर (पूर्ण नाव माहीत नाही), श्रीपाल जैन, संतोष दुबे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Loan fraud : विनातारण कर्जाच्या नावाने महिलेला पंधरा लाखांचा गंडा appeared first on पुढारी.