Nandurbar : अचानक झालेल्या दगडफेकीने नंदुरबार हादरले

पोलीस,www.pudhari.news

नंदुरबार : अचानक दगडफेक करीत एक जमाव चालून आल्यामुळे नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन पोलीस कर्मचारी आणि काही तरुण या दगडफेकीत जखमी झाले आहेत तथापि वेळीच पोलीस ताफा धावून आल्यामुळे सर्व स्थिती नियंत्रणात आली.

रमजान महिना चालू असल्याने धार्मिक वातावरण संवेदनशील आहे. त्याचबरोबर हनुमान जयंती आंबेडकर जयंती पाठोपाठ 22 एप्रिल रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाशिव कथा आयोजित करण्यात आलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडलेली दंगल शहरवासीयांना विचलित करणारी आहे. याविषयी अधिक वृत्त असे की, मंगळवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी रात्री 11:30 नंतर नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मोठ्या संख्येने एक जमाव घोषणा देत अचानक चालून आला. तुफान दगडफेक या जमावाकडून चालू झाल्यामुळे झोपेत असलेले नागरिक हादरले. दगडफेक करीत चालून आलेल्या पैकी काही जणांनी वाहनांची तोडफोड करीत जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार थांबविण्यासाठी दुसरा जमाव रस्त्यावर उतरला आणि त्यांनीही दगडफेक सुरू केली. घटना समजताच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक किरण खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि इतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

दगडाचा वर्षाव होत असतानाही ते धाडसाने जमाव नियंत्रित करीत पुढे घुसले. यात निरीक्षक किरण खेडकर, निरीक्षक रवींद्र कळमकर आणि अन्य दोन कर्मचारी यांना दगडांचा मार बसला. पहाटे तीन वाजेपर्यंत सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात पोलीस दलाला यश आले. लगेचच अटक सत्र सुरू करून गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन वाहनांचे नुकसान झाले दोन कर्मचारी जखमी झाले तसेच आठ जणांना रात्री अटक करण्यात आली असून जुन्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. आज बुधवार रोजी देखील अटक सत्र सुरूच आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच जातीय तेढ निर्माण होईल अशा अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे. जमावाच्या स्वरूपात येऊन काही जणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला दगडफेक केली परंतु पोलीस दलाने वेळेवर येऊन सर्व स्थिती नियंत्रित केली आता त्या भागात शांतता आहे व शहरातील व्यवहारही सुरळीत आहेत. शांतता भंग करणाऱ्या जमावातील काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी आर पाटील यांनी दिली.

हेही वाचा : 

The post Nandurbar : अचानक झालेल्या दगडफेकीने नंदुरबार हादरले appeared first on पुढारी.