Nashik : उंटासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांचा राजस्थान पोलिसांसोबत पत्रव्यवहार

उंटाची तस्करी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील रस्त्यांवर उपाशी पोटी उंट फिरत असल्याने त्यांचा निर्दयी छळ होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी उंट मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या उंटांची जबाबदारी कोणाची आहे याबाबत अद्याप संदिग्धता आहे. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी पत्रव्यवहार करून उंटाबाबत माहिती मागविल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राजस्थान पोलिसांकडून माहिती मिळाल्यास ग्रामीण पोलिसांना कारवाई करता येणे सोपे होणार असून उंटाची वाहतूक कोणत्या कारणासाठी होत होती हे कोडं उलगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उंटाची वाहतूक होताना दिसत आहे. ग्रामीण भागातून शहरात दाखल झालेल्या शंभरहून अधिक उंटांना पांजरपोळ येथे ठेवण्यात आले आहे. मात्र पाणी, खाद्याअभावी तब्येत खालावल्याने चार उंटांचा मृत्यू झाला आहे. मालेगावमधूनही ४३ उंट जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत १५४ उंट जप्त करण्यात आले असून, चौघांचा प्रकृती अस्वस्थतेमुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, उंटांना निर्दयीपणे वागणूक दिल्याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी संशयित उंट मालक गुटिया अब्दुल सैय्यद, अस्लम रफीक सैय्यद (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर नाका, नाशिक), दीपक मेहताब सैय्यद व शाहरूख मेहताब सैय्यद (दोघे रा. पंचवटी) आणि शाहनूर सैय्यद, समीर गुलाब सैय्यद, इजाज गुलाब सैय्यद (तिघे रा. जालना) यांची चौकशी केली आहे. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार हे उंट जत्रांमध्ये वापरतात व पर्यटकांच्या सफारीसाठीही वापर केला जातो. उंटांची मालकी अनेक वर्षांपासून आमच्याकडे असून सातत्याने त्यांचा प्रवास सुरू असल्याचे मालकांनी सांगितले. त्यानुसारही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर, मालेगाव तालुका पोलिसांनीही अहमदनगर जिल्ह्यातील संशयितांना यांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी पत्रव्यवहार करून राजस्थानमधील उंटांसंदर्भातील कायद्यांची माहिती मागवली आहे. जिल्ह्यात जप्त केलेल्या उंटांचा राजस्थानसोबत संबंध आहे का, राजस्थानमधून महाराष्ट्रातील नागरिकांना उंट विक्री कोणी व कशासाठी केले? संशयितांवर राजस्थानातील कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई करता येईल? आदी माहिती पत्रातून मागवल्याचे समजते. राजस्थान पोलिसांकडून उत्तर मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांची तपासाची पुढील दिशा ठरणार असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा :

The post Nashik : उंटासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांचा राजस्थान पोलिसांसोबत पत्रव्यवहार appeared first on पुढारी.