Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले

नाशिक

दातली : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुसळगाव येथे आज गुरुवार(२५) पासून अमृतमहोत्सवी सप्ताह सुरू झालेला असून या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस असल्याने सकाळी महंत श्री श्री दौलत दास जी महाराज, ह भ प नारायण महाराज पंढरपूरकर, महंत 108 स्वामी राधेश्वरानंदगिरीजी यांचे दर्शन व प्रवचनाचा कार्यक्रम होता. या निमित्ताने गावातील संपूर्ण ग्रामस्थ सप्ताहासाठी जमले होते. दरम्यान घरात कोणीही नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेत सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे.

मुसळगाव येथील रामनाथ वामन सिरसाठ व त्यांच्ये घरातील इतर सदस्य सप्ताह निमित्त सकाळी  घराला कुलूप लावून गावात गेलेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत बंद घराचे कुलूप कोयंडा तोडून घरातील सामानाची उचकापाचक करत लॉकर मधील अंदाजे पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने तसेच तीस हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला. शिरसाठ हे दुपारी एक वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती कळवली.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव निकम, सपोनि गरुड, पोलीस उपनिरीक्षक वाजे, पो.नाईक सचिन काकड, विनोद इप्पर, स्वप्नील पवार आदींनी घटनास्थळी भेट दिली. शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

गुन्ह्यांचा तपास लागत नाही पोलिसांवर नाराजी 
ग्रामीण भागात घरफोड्या, चोऱ्यांचे  सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर घरफोडी, चोऱ्या झाल्या आहेत. या सर्व गुन्ह्यांची अद्यापही उकल झालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

The post Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले appeared first on पुढारी.