Nashik : मृत रुग्ण जिवंत होतो तेव्हा…, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रुग्णाचा इसीजी केल्यानंतर कागदावरील सरळ रेषा म्हणजे रुग्णाच्या हृदयाची धडधड बंद झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सांगितले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. गुरूवारी (दि.25) जिल्हा रुग्णालयातही इसीजी रिपोर्टनुसार मृत ठरवलेला रुग्ण काहीवेळाने जिवंत असल्याचे लक्षात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

अशोकस्तंभ परिसरातील एका व्यावसायिकाने सोमवारी (दि. २२) दुपारी पेटवून घेतले होते. ९३ टक्के भाजल्याने त्यास उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, गुरुवारी (दि.२५) त्याच्यावर उपचार सुरू असताना सकाळी ६.३०च्या सुमारास रुग्णाची कोणतीही हालचाल होत नव्हती. यामुळे वॉर्डमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थी डॉक्टरने वैद्यकीय तपासणी करीत इसीजी रिपोर्ट फ्लॅट आल्याने त्यांनी नातेवाइकांना रुग्णाचे निधन झाल्याचे सांगितले. यामुळे नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनीही पुढील प्रक्रिया सुरू केली. मात्र सकाळी ८ च्या सुमारास वॉर्डमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यास मृत रुग्णाच्या पायांची मंद हालचाल दिसल्याने त्यांनी रुग्णाचा पुन्हा इसीजी केला. त्यात हृदयाचे ठोके आल्याने रुग्ण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समजताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. तसेच रुग्ण जिवंत असल्याची माहिती पुन्हा नातेवाइकांना दिली, त्यामुळे नातलगांना आनंद झाला. मात्र, डॉक्टरांनी आधी चुकीची माहिती दिल्याचा समज हाेऊन संतापलेल्या नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जळीत कक्षातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना बोलावले तसेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही नातलगांची समजूत काढली. दरम्यान, सकाळी ९.३० वाजता रुग्णाचे हृदय पुन्हा बंद पडले. डॉक्टरांनी प्रयत्न केल्याने हृदय सुरू झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही हा अनुभव नवीनच होता.

काही क्षणांसाठी मृत्यू?

रुग्णास रुग्णालयात दाखल केल्यापासून श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यास व्हेंटिलेटर लावले आहे. गुरुवारी (दि.२५) सकाळी इसीजी काढल्यांनतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. तरी त्याचा व्हेंटिलेटरवरील ऑक्सिजन व सलाइनद्वारे औषध सुरू होते. कदाचित काही क्षणांसाठी हृदय बंद पडले असावे आणि त्याचवेळी रिपोर्ट केला असावा, अशी शक्यता जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी डीन गोपाळ शिंदे यांनी वर्तवली.

गंभीर भाजलेल्या रुग्णावर उपचार करणे अत्यंत जिकिरीचे असते. एकाचवेळी अनेक समस्या निर्माण होतात. वैद्यकीय क्षेत्रात चमत्कारावर विश्‍वास ठेवता येत नाही, परंतु काही घटना अत्यंत दुर्मिळ असतात. रिपोर्टनुसार रुग्णाचा मृत्यू झाला, मात्र काही क्षणांसाठी. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुन्हा औषधोपचार सुरू केले आहेत.

– डॉ. अरुण पवार, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक

हेही वाचा :

The post Nashik : मृत रुग्ण जिवंत होतो तेव्हा..., जिल्हा रुग्णालयातील प्रकार appeared first on पुढारी.