Nashik : आदिवासी पाड्यावरील लेक पहिल्याच प्रयत्नात झाली पोलीस उपनिरीक्षक

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे

आदिवासी बहुल छोटीशी वस्ती, त्यात वडीलांकडे अत्यल्प शेत, त्यातून येणाऱ्या पैशातून घर, शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी होणारी आईवडिलांची धडपड हे सर्व बघवत नव्हते. हि परिस्थिती बदलावयाची असेल तर आपल्याला अभ्यास करून मोठे व्हावे लागेल अशी जिद्द, चिकाटी अन कठोर मेहनत उराशी बाळगून चांदवड तालुक्यातील पारेगाव शिवारातील रामायेसूचापाडा येथील लता कोंडाजी बागुल हरहुन्नरी लेकीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिच्या या यशामुळे आईवडिलांचा उर भरून आला असून आयुष्य सार्थकी लागल्याचे ते मोठ्या भावनेने सांगत आहे.

तालुक्यातील पारेगाव शिवारातील माळरानात रामायेसूचापाडा ही दीडशे ते दोनशे लोकसंख्येची वस्ती वसली आहे. या वस्तीत कोंडाजी व विमल बागुल हे अल्पभूधारक शेतकरी वास्तव्यास आहे. अत्यल्प शेतीतून येणाऱ्या कमी अधिक उत्पन्नातून बागुल दांपत्य घर खर्च व मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवीत असत. या गरीब परिस्थितीत आईवडिलांची होणारी घालमेल बघता त्यांची दोन नंबरची लेक लता हिने ही परिस्थिती बदलवण्याचा निश्चय खेळण्याबागडण्याच्या वयातच केला. अंगी जिद्द, चिकाटी व कठोर मेहनत अन् हुशारीच्या जोरावर तिने शालेय शिक्षण आदिवस्तीवरच पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण व पदवी तिने चांदवडलाच पूर्ण केली.

प्राथमिक ते पदवी पर्यंतच्या शैक्षणीक प्रवासात लताने अनेक कष्ट व हालअपेष्टा सहन केल्या. मात्र तरी देखील ती न डगमगता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिली. या काळात तिच्यातील हरहुन्नरीपणा, जिद्द व चिकाटी बघून काही शिक्षकांनी तिला आवश्यक ते सर्व मार्गदर्शन केले. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षाचा अभ्यास सुरु केला. आपल्याला सक्षम व समाजपयोगी कार्य करायचे असेल तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देण्याचा तिने निश्चय केला. यासाठी तिने विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर गाठले. एक ते दीड वर्ष चांगला अभ्यास केल्यानंतर लताने केंद्रीय लोकसेवा आयोगाचे दोन वेळेस पेपर दिले. यात तिचा नंबर काही लागला नाही. यामुळे हताश न होता लताने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आता कोणत्याही परिस्थितीत यश पदरात पाडायचेच हा मनोमन निर्धार केला. यासाठी तिने योग्य नियोजन करीत अभ्यास केला. याचे फळीत स्वरुपात तिने पहिल्याच प्रयत्नात राज्य उत्पादन शुल्काच्या पोलीस उपनिरीक्षक पदी यश संपादन केले. लता बागुल या आपल्या चिमुकलीने यश पदरात पाडीत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याच्या आनंदाने कोंडाजी बागुल व विमल बागुल दोघांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू वाहत आहे.

आई वडिलांचा विश्वास, गुरुजनांनी केलेले मार्गदर्शन व मित्र–मैत्रीणींची साथ यामुळे अभ्यास करताना मोठा आधार मिळाला. यामुळे अभ्यास करण्याचे हुरूप अंगी बाळगून दिवसातून १७ ते १८ तास अभ्यास केला. अभ्यास करताना मोबाईलचा वापर फक्त आईवडिलांशी बोलण्यासाठी केला. पर्यायाने अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळाल्याने हे यश मिळविता आले.

  • लता बागुल, पोलीस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.

हेही वाचा :

The post Nashik : आदिवासी पाड्यावरील लेक पहिल्याच प्रयत्नात झाली पोलीस उपनिरीक्षक appeared first on पुढारी.