Nashik : आदिवासी विकास विभागास ४७ लाखांचा गंडा, चौघांविरुध्द गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विकास विभागाच्या नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक, संस्थाचालक, लिपिक व इतरांनी संगनमत करून शासनास गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित हर्षल पुंडलिक चौधरी, गोपीनाथ बोडके, लोकेश बाेडके व आणखी एकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागात खळबळ उडाली आहे.

नितांत नागनाथ कांबळे (५३, रा. पेठ रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी ७ जून रोजी शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार आदिवासी विकास भवनमधील प्रकल्प कार्यालयातील लेखा शाखेत उघडकीस आला आहे. सहायक प्रकल्प अधिकारी कांबळे यांच्या फिर्यादीनुसार, शिक्षक हर्षल चौधरी यांचे मे महिन्याचे वेतन देयक करताना संशयितांनी कागदपत्रांचे बनावटीकरण करून गंडा घातला. चौधरी यांचे वेतन देयक करताना वेतन व भत्त्याचा फरक रक्कम तब्बल ४७ लाख ४८ हजार ६६१ रुपये इतका दाखवण्यात आला. त्यास अधिकृत मंजुरी नसतानाही शालार्थ प्रणालीमध्ये गैरमार्गे युझर आयडी वापरून परस्पर ऑनलाइन पद्धतीने वेतन देयकात समाविष्ट केले. ऑनलाइन प्रणालीमधून वेतन अदा करून बोगस कागदपत्रे सादर केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिक्षक चौधरी याच्यासह संस्थाचालक, लिपिक व संस्थेचा कर्मचारी यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस तपास करीत आहे.

दोन दिवस चौकशी

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाने या घटनेची खातेंतर्गत दोन दिवस चौकशी केली. त्यानंतर चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात तथ्य आढळून आल्याने सहायक प्रकल्प अधिकारी नितांत कांबळे यांनी संबंधित शिक्षक, संस्थाचालक व इतर दोघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली.

हेही वाचा :

The post Nashik : आदिवासी विकास विभागास ४७ लाखांचा गंडा, चौघांविरुध्द गुन्हा दाखल appeared first on पुढारी.