Nashik : जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

जिल्हाधिकारी गंगाथरन डी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खरीप हंगाम २०२३ करिता शासनाकडून युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकूण २.२३ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. आजअखेर जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी शक्य असल्यास कृषिनिविष्ठांची खरेदी करण्यास सुरुवात करावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात युरिया खत ३६ हजार ५५८ मेट्रिक टन, डीएपी १६ हजार ६९० मेट्रिक टन, एमओपी १ हजार ७२४, एसएसपी १४ हजार ७०५ मेट्रिक टन व संयुक्त खते ६६ हजार ८७४ मेट्रिक टन असे एकूण १ लाख ३६ हजार ५९९ मेट्रिक टन खते उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याकरिता कापूस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग व उडीद इत्यादी पिकांचे एकूण ८६ हजार ९३१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत. तसेच कापूस पिकाच्या विविध वाणांचे एकूण १ लाख ३८ हजार ७०० पाकिटांचा पुरवठा जिल्ह्यात झालेला असून, जिल्ह्यात खते व बियाणांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजनुसार पुढील आठवड्यात राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. त्या अनुषंगाने पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यानंतर एकाच वेळी कृषिनिविष्ठा विक्री केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी कृषिनिविष्ठांची खरेदीस सुरुवात करावी. जेणेकरून मागणीनुसार कृषिनिविष्ठांच्या उपलब्धतेबाबतचे नियोजन कृषी विभागास करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती appeared first on पुढारी.