Nashik : डोंगरगावला वादळाने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त, हजारो पक्ष्यांचा मृत्यू

पोल्ट्री फार्म जमीनदोस्त,www.pudhari.news

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

वादळी पावसाने पोल्ट्री जमीनदोस्त होऊन हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली.

येवला तालुक्यातील पूर्व भागातील डोंगरगाव येथे सोसायटीच्या वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावल्याने डोंगरगाव येथील कृष्णा सोमासे यांच्या पोल्ट्री फार्मचे शेड जमीनदोस्त झाले. या पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास सहा हजार पक्षी होते. अशी माहिती पोल्ट्री फार्म व्यावसायिक यांनी दिली आहे. या वादळामुळे पोल्ट्री फार्म पडल्याने यात दबून जवळपास चार हजार पक्षी मरण पावल्याचे पोल्ट्री व्यावसायिकाने सांगितले. या दुर्घटनेत पोल्ट्री आणि मृत पक्षी मिळून अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामी होऊन नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

राजापूरला चाळ, शेततळ्यांचे नुकसान

राजापूर येथे अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडे पडली आहेत. काही ठिकाणी चाळीचे शेड व पत्रे उडाले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन संपूर्ण परिसर अंधारात होता. दरम्यान सलग दोन दिवस पावसामुळे जमीन खरिपाच्या पेरणीसाठी मशागतीला तयार करण्याला वेग आला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने खंडित असलेला पुरवठा ४० ते ४५ तास सुरळीत झाला नव्हता. गावात वीजपुरवठा सुरू झाला पण वाड्या-वस्त्यांवर पुरवठा खंडित झाल्यामुळे वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने खूपच हाल होत आहे. या भागामध्ये पावसाळ्यात नेहमीच तासनतास वीजपुरवठा खंडित राहात असून, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी येथे राहात नसल्याने पुरवठा सुरळीत होण्यासाठी विलंब लागतो. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, वादळी पावसामुळे परिसरात व पन्हाळसाठे-रेंडाळा रस्त्यालगत मोठमोठी झाडे पडल्याने काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. माजी सरपंच सुभाष वाघ, दत्ता सानप व ग्रामस्थांनी झाडे बाजूला करून रस्ता मोकळा केला. घर, चाळ, शेततळे आदींच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

कांदा चाळीचे पत्रे उडाले

बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केलेल्या कांदा चाळीचे पत्रेसुद्धा उडाले आहेत. गणाधीश इंटरनॅशनल स्कूलशेजारी असलेल्या संतोषीमाता कृषी भांडार या दुकानाचे संपूर्ण शेड उडून विजेच्या तारेवर पडले होते. तसेच या विद्यालयाजवळ शाळेच्या वस्तू ठेवण्यासाठी छोटीशी शेड उभारण्यात आले होते. ते शेडही शे-दोनशे फूट उंच उडून लांब फेकले गेले. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजनांचे विद्युत पंप बंद असल्याने गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

The post Nashik : डोंगरगावला वादळाने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त, हजारो पक्ष्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.