Nashik :’थर्टी फस्ट’, न्यू इअर सेलिब्रेशन; शहरात चार दिवस पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

पोलीस बंदोबस्त नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

थर्टी फर्स्टला शनिवार व रविवार अशा सलग दोन सुट्या आल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. नववर्ष स्वागतासाठी अनेकांनी बेत आखले आहेत. तर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनीही बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.२९) रात्रीपासून पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्त राहणार असून, सोमवारी (दि. २) पहाटेपर्यंत बंदोबस्त राहणार आहे.

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्ताची आखणी करण्यासाठी मंगळवारी (दि.२७) पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त व पोलिस निरीक्षक उपस्थित होते. त्यानुसार शहरात २९ डिसेंबरपासून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. रात्री आठपासून पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून तपासणी करण्यात येईल. मद्यपी चालक, टवाळखोर व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. यासह आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व आस्थापना, व्यवस्थापन, मॉल्स, दुकाने, उपाहारगृहांमध्ये वेळेची मर्यादा पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी राहणार असून, वाहतूक शाखेचे पोलिसही तैनात असतील. मद्यपी चालकांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. वाहनांचे हॉर्न, सायलेन्सर तपासणी केली जाईल. पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांवरही पोलिस करडी नजर ठेवणार असून हॉटेल बाहेर, फिरते गस्ती पथकाद्वारे मद्यपींवर नजर ठेवण्यात येणार आहे.

– सर्वत्र नाकाबंदीसह तपासणी

– २ उपआयुक्त, ७ सहायक आयुक्तांसह सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी

– १३ पोलिस ठाण्यांचा बंदोबस्त

– २ राज्य राखीव दलाच्या तुकड्या

– २५० पुरुष होमगार्ड, ५० महिला

हेही वाचा :

The post Nashik :'थर्टी फस्ट', न्यू इअर सेलिब्रेशन; शहरात चार दिवस पोलिस बंदोबस्ताचे नियोजन appeared first on पुढारी.