लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम

लाल वादळ pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आंदोलनकर्ते शेतकरी व जिल्हा प्रशासन यांच्यात चार दिवसानंतरही मागण्यांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. गुरुवारी (दि.२९) रात्री उशिराने प्रशासन व आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळामध्ये बैठक पार पडली. यावेळी आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लाल वादळा लाल वादळाचा शहरातील मुक्काम कायम आहे.

वनहक्क दाव्याअंतर्गत कसणाऱ्याच्या नावे जमीन करण्यासह सातबाऱ्यावर नावे लावावे, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांनी सोमवारपासून (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. सीबीएस चौक ते अशोकस्तंभ या परिसरात आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने वाहतूकीचा पुरता बोजवारा उडाला. दरम्यान, आंदोलकांच्या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी (दि.२९) माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरु होती.

जिल्हा प्रशासन स्थानिक पातळीवरील मागण्या तातडीने मार्गी लावण्याबाबत पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे. परंतु, धोरणात्मक निर्णयाबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात मंगळवारी (दि.२७) मुंबईत बैठक पार पडली. मात्र, सदर बैठकीत आंदोलनकर्त्यांच्या समाधान न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला. आंदोलनकर्त्यांनी मागण्यांबाबत शासनाला शनिवारपर्यंतचा (दि.२) अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत योग्य तो निर्णंय न घेतल्यास आमरण उपोषण, जेलभरो किंवा मुंबईला लाँग मार्च  काढण्याचा इशाराच देण्यात आला आहे. त्यामुळे शासन आता काय निर्णय घेते, यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

रुग्णवाहिका तैनात
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेमधील स्टाफकडून दिवसभरात शेकडो आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी करताना त्यांना विविध प्रकारची औषधे वितरीत करण्यात आली. यावेळी आराेग्य कर्मचाऱ्यांच्या आस्थेवाईकपणामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला.

पाण्यासाठी टँकर
आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासन व नाशिक महापालिकेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. सीबीएस चाैक ते अशोकस्तंभ या परिसरात ठिकठिकाणी हे टँकर उभे करण्यात आले आहेत. पाण्याच्या बॉटल्स‌् भरुन घेण्यासाठी शेतकऱ्यांची सदर टँकरवर झुंबड उडत आहे.

डाळ-भात जोडीला ठेचा
मागण्यांबाबत आज ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने शेतकरी काहीसे नाराज झाले. शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच चुली पेटवित रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली. नागली व ज्वारीच्या भाकऱ्या जोडीला ठेचा तसेच डाळ-भात शिजवला.

The post लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम appeared first on पुढारी.