Nashik : बालकांच्या ताब्यासाठी पालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना आर्जव

जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बिहारमधून रेल्वेने कथित तस्करी प्रकरणातून (Nashik Child Trafficking)  पोलिसांनी सुटका केलेल्या अल्पवयीन मुलांच्या पालकांनी सोमवारी (दि.१२) पुन्हा एकदा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची पुन्हा भेट घेत मुलांचा ताबा मिळावा, अशी विनंतीवजा आर्जव जिल्हाधिकाऱ्यांना केले. दरम्यान, शुक्रवारीही (दि. ९) हे पालक कार्यालयात ठाण मांडून होते.

रेल्वे पोलिसांनी ३० मे रोजी जळगाव ते मनमाड या दरम्यान बिहारवरून आलेल्या रेल्वेगाडीतून ८ ते १४ वयोगटातील ५९ मुलांची सुटका केली होती. यापैकी ३० बालके नाशिकच्या उंटवाडीतील बालगृहात दाखल करण्यात आली असून, २९ मुले जळगावमध्ये आहेत. बालगृहातील या मुलांचे पालक गेल्या ८ दिवसांपासून मुलांच्या ताब्यासाठी विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. या पालकांनी गेल्या शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बालकांचा ताबा द्यावा, अशी मागणी केली होती. दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी दिले होते. मात्र, मुदत संपुष्टात आल्यानंतरही मुलांचा ताबा मिळत नसल्याने पालकांनी सोमवारी (दि. १२) पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी आम्ही मुलांना स्वखुशीने शिक्षणासाठी पाठवले होते. बालकांकडे रीतसर रेल्वेचे आरक्षणही होते. त्यामुळे आमच्याकडे बालकांना सुपूर्द करावे, अशी आर्जव केली. दरम्यान, मुलांबाबतची कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांना थेट पालकांच्या स्वाधीन न करता त्यांचा ताबा बिहारमधील बालकल्याण समितीकडे देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी प्रशासन हे बिहारमधील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. (Nashik Child Trafficking)

पुन्हा पाठविणार नाही

ताब्यात घेतलेल्या बालकांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविले होते. मात्र, सध्याची परिस्थिती व मुलांच्या ताब्यासाठी शासकीय कार्यालयांचे झिजवावे लागणाऱ्या उंबरठ्यांमुळे पालक हैराण झाले आहेत. भविष्यात आपल्या मुलांना कधीच महाराष्ट्रात पाठविणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.

हेही वाचा :

The post Nashik : बालकांच्या ताब्यासाठी पालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना आर्जव appeared first on पुढारी.