Nashik : म्हसरूळचे पीकॉक हिल आगीच्या भक्ष्यस्थानी

पिकॉक हिल्स,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

म्हसरूळ परिसरातील मोरांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पीकॉक हिल परिसराला रविवारी (दि. १२) दुपारी भीषण आग लागली. आगीच्या ज्वालांनी होरपळून दोन मोर जखमी झाले. या आगीत वनविभागासह वनविकास महामंडळाचे सुमारे १० हेक्टर क्षेत्रावरील गवत जळून खाक झाले. तसेच अनेक मोठ्या वृक्षांनाही आगीची झळ लागली आहे. वनविभाग, वनविकास महामंडळ आणि ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

पीकॉक हिल परिसरात असलेल्या राखीव वनामध्ये अचानक वणवा भडकला. वाळलेले रानगवत हवेच्या सहाय्याने वेगाने पेटल्याने आगीच्या ज्वाला भडकल्या. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिकच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे, वनपाल के. ई. खिरकाडे, एफडीसीएमचे वनपाल डी. एन. जाधव, वनरक्षक कविता पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत राखीव वनक्षेत्रात लागलेली आग विझविण्यास सुरुवात केली. मात्र, आग वेगाने पसरत असल्याने अग्निशमन दलाची मदत मागितली गेली. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने वरवंडी बाजूने डोंगरावरील आगीचा भडका उडाला. आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत प्रादेशिकच्या सुमारे सात, तर एफडीसीएमच्या तीन हेक्टरवरील गवताची राख झाली होती. दोन मोर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तात्पुरत्या उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे. ईको-एको फाउंडेशनचे स्वयंसेवक जखमी मोरांवर उपचार करीत आहेत.

मोरांचे आश्रयस्थळ धोक्यात

पीकॉक हिल परिसरात मोरांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, आगीमुळे संपूर्ण गवत जळून खाक झाल्याने मोरांचे आश्रयस्थळ धोक्यात आले आहे. आगीत दोन मोर ज‌खमी झाले असून, काही मोरांचा होरपळून मृत्यूही झाल्याचा अंदाज असून, मृत मोरांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Nashik : म्हसरूळचे पीकॉक हिल आगीच्या भक्ष्यस्थानी appeared first on पुढारी.