Nashik : लतादिदींच्या स्मरणार्थ होणाऱ्या आरोग्य केंद्राला ग्रामस्थांचा विराेध

लता मंगेशकर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतरत्न ग्रानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सोमवारी (दि.६) प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जगभरातून आदरांजली अर्पण केली जात असताना तिरडशेत येथे त्यांच्या नावे उभ्या राहणाऱ्या आरोग्य केंद्र व रूग्णालयाला काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या जागेचा वापर गावठाण विकासासाठी करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असल्याने या केंद्राचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या इच्छेनुसार त्र्यंबकेश्वर रोडवरील तिरडशेत येथे गोरगरीबांसाठी तसेच वृद्ध कलाकरांसाठी आरोग्य केंद्र व रूग्णालय उभारण्यात येणार आहे. स्वर माऊली फांउडेशनच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या या केंद्रासाठी तिरडशेतमध्ये पाच एकरचा शासकीय भुखंड देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली. त्यासाठी तिरडशेत येथील गट नंबर १९ मधील शासकीय जागा प्रशासनाने सुचविली. दरम्यानच्या काळात ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि फांऊडेशनचे मयुरेश पै यांनी ४ जानेवारीला तिरडशेतच्या जागेची पाहणीही केली. त्यानंतर जागेचा प्रस्ताव प्रशासनाने मंत्रालयात अंतिम मान्यतेसाठी पाठविला. मात्र, आरोग्य केंद्रावरून गावातच दोन गट पडले आहे. एका गटाकडून आता या केंद्राला विरोध दर्शविला आहे. सदर जागेचा वापर हा गावठाण विकासासाठी करण्यात यावा, अशी मागणी करत सोमवारी (दि.६) गावकऱ्यांनी निदर्शने केली. एकुणच प्रकल्प ऊभा राहण्यापूर्वीच त्याचा वाद निर्माण झाल्याने लतादिदींचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

ग्रामसभेचा ठराव

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे ऊभारण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्र व रूग्णालयाला जागा देण्यासाठी तिरडशेत येथे ९ जानेवारी २०२३ ला विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत केंद्राला जागा देण्यासंदर्भातील ठराव करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच जागेच्या वादाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा :

The post Nashik : लतादिदींच्या स्मरणार्थ होणाऱ्या आरोग्य केंद्राला ग्रामस्थांचा विराेध appeared first on पुढारी.