Nashik : वागदर्डीने गाठला तळ, महिनाभराचा उरला पाणीसाठा

वागदर्डी धरण,www.pudhari.news

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या धरणात एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरात पाणीबाणी निर्माण झाल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी पालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली असून, पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळाले नाही, तर आगामी काळात एक हंडा पाण्यासाठी भटकंतीची वेळ सव्वालाख नागरिकांवर येणार आहे.

एकीकडे धरणाने तळ गाठल्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट आलेले असताना दुसरीकडे मात्र पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन मिळावे, यासाठी एकही राजकीय पक्ष, संघटना प्रयत्न करत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे.

सुमारे आठ महिन्यांपूर्वी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग जोरदार पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईतून आपली सुटका होईल, असे नागरिकांना वाटत होते. मात्र वागदर्डी धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात केवळ 25 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून त्यात सुमारे 3 ते 4 दशलक्ष घनफूट मृतसाठा आहे. उर्वरित पाण्यातून शहरात सध्या 12 ते 15 दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

शहराचा पाणीपुरवठा हा पावसाळ्याच्या पाण्यावर कमी, तर पालखेड धरणातून मिळणाऱ्या आवर्तनावर अधिक अवलंबुन आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर ते पाणी पाटोद्यात साठवणूक करण्यात येते. तेथून पंपिंगद्वारे वागदर्डी धरणात उचलले जाते. मात्र दीड महिन्यापूर्वी पालखेडमधून आवर्तन सोडल्यानंतर थकबाकीचे कारण पुढे करत पाटबंधारे विभागाने वेळेवर आणि पाहिजे तेवढे पाणी दिले नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. आताही पालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे पाण्याच्या आवर्तनाची मागणी केली आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : वागदर्डीने गाठला तळ, महिनाभराचा उरला पाणीसाठा appeared first on पुढारी.