Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार!

शेतकर्याचा मुलगा झाला फौजदार

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : वार्ताहर

रानवड सहकारी साखर कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कारसूळ (ता. निफाड) येथील शेतकऱ्याचा मुलगा फौजदार झाला. खडतर प्रवासातून प्रशांत मधुकर ताकाटे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. त्याच्या या यशामुळे कारसूळ ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. तर मुंबई नाका परिसरात मिरवणूक काढण्यात आली.

कारसूळ येथील शेतकरी मधुकर ताकाटे यांना अवघी दीड एकर शेती. परिस्थिती हलाखीची… त्यांना एक मुलगा व मुलगी… एक – दोन दुभत्या जनावरांच्या माध्यमातून महिन्याकाठी येणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर त्यांनी मुलांचे शिक्षण केले. कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी त्यांनी १९८७ ते १९९४ या काळात रानवड सहकारी साखर कारखान्यात कंत्राटी पद्धतीने कामगार म्हणून काम केले. ७ रुपये रोजंदारीने काम करीत असताना मधुकर ताकाटे यांना मिळणाऱ्या अल्प आर्थिक मोबदल्यामुळे त्यांनी १९९४ ला साखर कामगार पदाचा राजीनामा दिला आणि थ्रेशर मशिनचा व्यवसाय सुरू केला. पाच वर्ष इमानेइतबारे त्यांनी शेतकऱ्यांना चांगली सेवा दिली. याच दरम्यान मुलगी अर्चना हिने एम. एसस्सी व बीएडपर्यंतचे शिक्षण घेतले. काही दिवसांतच तिची रानवड येथील क. का. वाघ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. तर प्रशांतही शिक्षण घेत होता. २०१४-१५ मध्ये प्रशांतने पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात बी. एसस्सीचे शिक्षण पूर्ण केले. परंतु, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने काही दिवस खेडगाव (ता. दिंडोरी) येथे चौथी – पाचवीच्या मुलांसाठी खासगी क्लास चालवले. हे करीत असताना त्याला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. त्यामुळे त्याने नंतर नाशिक येथील मुलांसाठी खासगी क्लास सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या कमाईतून त्याने स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली. यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परिक्षेत यशाला हुलकावणी मिळाली. परंतु, प्रशांतने जिद्द सोडली नाही. २०२२ ला झालेल्या परिक्षेत त्याने अहोरात्र अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. मंगळवारी (दि. ४) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निकाल जाहीर झाला. त्यात प्रशांत याची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्याचे जाहीर होताच कुटुंबासह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

आतापर्यंत केलेल्या कष्टाचे हे फळ आहे. हलाखीच्या परिस्थितीची जाणीव ठेवत मुलाने खडतर प्रवासातून यशाला गवसणी घातली. त्यामुळे आमची मान अभिमानाने उंचावली आहे.

– मधुकर ताकाटे, प्रशांतचे वडील

माझ्या यशात आई- वडिलांचा मोठा वाटा आहे. त्यांनी दिलेले संस्कार, पाठबळ व पाठिंब्यामुळे आपण या पदापर्यंत पोहचू शकलो. तरुणांनी परिस्थितीचा बाऊ न करता स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर कुठलेही यश दूर नाही.

– प्रशांत ताकाटे, पोलीस उपनिरीक्षक

सामान्य कुटुंबातील प्रशांतने हलाखीच्या परिस्थितीची जाणीव ठेवत जिद्दीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. खेडेगावातील मुलांसाठी हा आदर्श म्हणावा लागेल.

– दिलीप मोरे, संचालक, पिंपळगाव बाजार समिती

कारसूळ गावच्या इतिहासात प्रथमच पोलीस उपनिरीक्षक पदाला प्रशांतच्या माध्यमातून यश मिळाले आहे. यामुळे गावासोबतच सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

– स्वाती काजळे, सरपंच, कारसूळ

हेही वाचा : 

The post Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार! appeared first on पुढारी.