नाशिक : बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्याची फसवणूक

देवळा www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

खर्डे, ता. देवळा येथील शेतकरी धनजी श्रीपती जाधव यांची घेवडा बनावट बियाण्यांमुळे मोठी फसवणूक झाली असून सबंधित बियाणे कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खर्डे, ता. देवळा येथील शेतकरी धनजी जाधव यांनी कळवण येथून गिरणा कृषी एजन्सी दुकानातून सेमिनिज कंपनीचे घेवडा मोडालिटा बियाणे खरेदी केले. बियाणे लागवडीसाठी जाधव यांनी शेतात मल्चिंग पेपर टाकलेला आहे. त्यासाठी त्यांना जवळपास तेरा हजार रुपये खर्च आला. तसेच सहा हजार सहाशे रुपयांचे घेवडा बियाण्यांची त्यांनी लागवड केली आहे. मात्र, सदर बियाणे बनावट निघाल्याने शेतकऱ्याचा संपूर्ण लागवडीचा खर्च वाया गेला आहे. यासंबंधी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने बियाणे कंपनीकडे तक्रार केल्यानंतर जाधव यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची नेहमीच फसवणूक होत असल्याने याची कृषी विभागाने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून भाजीपाला पिकाची लागवड करीत आहेत. मोठ्या काबाड कष्टाने पिकविलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यात अशा प्रकारे फसवणूक होत असल्याने शेतकऱ्यांनी दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो रुपये खर्च करून पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे ठाकले असून, शासनाने बियाणे कंपन्यांच्या मुजोरीला आवर घालावा. खर्डे येथील शेतकऱ्याची घेवडा बियाण्यात झालेल्या फसवणूकीची तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अन्यथा कंपनी विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा शेतकरी जाधव यांनी दिला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्याची फसवणूक appeared first on पुढारी.