Nashik : सातपूर ग्रामदेवता सप्तशृंगी टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा; आ. सीमा हिरे यांची विधानसभेत मागणी

आमदार सीमा हिरे,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
गंगापूररोडवरील नवश्या गणपती, सातपूर येथील सप्तशृंगी मंदिर तसेच सोमेश्वर येथील महादेव मंदिर आदी परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यास वाव आहे. तातडीची बैठक घेऊन या सर्व स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नाशिक पश्चिमच्या आ. सीमा हिरे यांनी विधानसभेत पर्यटन विकास या विषयावरील चर्चेत भाग घेताना केली.

गंगापूररोडवर आनंदवली आणि सोमेश्वर दरम्यान गोदाकाठी निसर्गरम्य अशा परिसरात पेशवेकालीन नवश्या गणपती मंदिर वसलेले आहे. नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती असल्याने वर्षभर या परिसरात गर्दी असते. नदीकाठ लाभल्याने येथे पर्यटकांना बोटीचा आनंदही लुटता येतो. त्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळते हे लक्षात घेऊन या परिसरात भाविकांना मोठ्या प्रमाणात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, असेही आ. हिरे म्हणाल्या.

सातपूरला उंच टेकडीवर वसलेले सप्तशृंगीमातेचे ऐतिहासिक मंदिर असून परिसरातील भाविकांचे ते आकर्षण केंद्र झालेले आहे. गुढीपाडव्याला पंचक्रोशीत प्रसिद्ध यात्रेत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम येथे होतो. निगळ परिवारातील गणेश हा भवानीमातेचे दर्शन घेऊन बारागाड्या ओढतो. सातपूरकरांच्या बहुसंख्य जमिनी एमआयडीसीमध्ये गेल्या आहेत. त्यामुळे परिसरातीळ लोकांना मनोरंजन आणि विसाव्यासाठी उद्यान किंवा पर्यटनासाठी हक्काची जागा नसल्याने हा टेकडी परिसर पर्यटन विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. त्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, असेही आ. सीमा हिरे यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना स्पष्ट केले. गंगापूररोड परिसरातल्या सोमेश्वर येथील प्राचीन महादेव मंदिर परिसराला भाविकांचा श्रावणात तसेच वर्षभर सातत्याने वेढा असतो. पावसाळ्यात येथील धबधबा बघण्यासाठी तसेच येथील निसर्गमय परिसराचा आनंद लुटण्यास भाविकांची वर्षभरही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. जय रावल हे पर्यटनमंत्री असताना या परिसरासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून ॲम्फी थिएटर बांधले. ही सर्व धार्मिक स्थळे पर्यटन विकासाच्यादृष्टीने अत्यांत महत्त्वाची असून त्यासाठी भरीव निधीची तरतूद व्हावी आणि त्याबाबत एक तातडीची बैठक घ्यावी अशी मागणीही आ.हिरे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा :

The post Nashik : सातपूर ग्रामदेवता सप्तशृंगी टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा; आ. सीमा हिरे यांची विधानसभेत मागणी appeared first on पुढारी.