Nashik : साधुच्या कारची धडक बसून महिला ठार

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील वाहनतळाच्या समोरील गगनगिरी चौकात फुटाणे-शेंगदाणे विक्री करणारी महिला हातगाडा घेऊन घरी जात असताना पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. 6) रात्री नऊच्या सुमारास घडली. याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यशोदा प्रवीण कांबळे (35) असे मृत महिलेचे नाव आहे. कांबळे या नेहमीप्रमाणे दिवसभराचा व्यवसाय करून रात्री हातगाडा घेऊन घराकडे परतत असताना पाठीमागून आनंदा सत्यनारायण हे साधू कार (डीबी 04 एमबी 8902) चालवत पाठीमागून वेगात आले. यावेळी त्यांच्या कारची कांबळे यांना जोरदार धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यशोदा यांचे पती प्रवीण हे रिक्षा चालवतात. तर त्या स्वत: फुटाणे- शेंगदाणे विक्री करून प्रपंचाला हातभार लावत असत. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी चालक साधूसह अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून, अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, साधूने आपल्या छातीत दुखत असल्याचे कारण दिल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एल. जगताप करत आहेत.

साधूच्या वैद्यकीय तपासणीची मागणी

आनंदपुरी हे येथील आवाहन आखाड्यात वास्तव्यास आहेत. त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी नातेवाइकांनी पोलिसांकडे केली आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : साधुच्या कारची धडक बसून महिला ठार appeared first on पुढारी.