Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट

अशिमा मित्तल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गुरुवारी (दि.१४) सुरगाणा तालुक्याला भेट देत पंचायत समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी दीपक पाटील यांच्या तालुक्यातील सर्व सरपंच, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सुरगाणा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांनी नागरिकांना सर्व सुविधा पुरवाव्यात, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणेसह नागरिकांनीदेखील पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासकीय यंत्रणा सुरगाणा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी या सरपंच संवाद कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे कामकाज, योजना, ग्रामपंचायतींना मिळणारा पाच टक्के बंधित-अबंधित निधी, मनरेगा योजना याबद्दल मार्गदर्शन केले. आयुष्मान भारत गोल्ड कार्ड, नरेगा जॉबकार्ड, बेबी किटचे प्रातिनिधिक स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

सरपंच संवाद कार्यक्रमात सराडचे सरपंच नामदेव भोये, गोंदुणे सरपंच संजाबाई खंबाईत, पळसन सरपंच रंजना चौधरी यांनी मनोगत व्यक्त करत ग्रामपंचायतींचा व तालुक्याचा सर्वांगीण विकास हा लोकसहभागातून करण्यात येईल, असे सांगितले. या कार्यक्रमाची सांगता ही बालविवाह प्रतिबंधक शपथ घेऊन करण्यात आली.

कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तालुका स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करत अधिकाधिक लोकाभिमुख काम करावे असे सांगितले.

मनरेगा कामांना भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत कोठुळा येथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. त्याचबरोबर योजनेत काम करणाऱ्या नागरिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला.

उंबरठाण आरोग्य उपकेंद्रास भेट

सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण आरोग्य उपकेंद्र येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देत आरोग्य यंत्रणेद्वारे दिला जाणाऱ्या सोयी सुविधांबाबत चौकशी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत चौकशी केली.

जि. प. शाळा उंबरठाण येथे भेट

जिल्हा परिषद शाळा उंबरठाण येथे भेट देत मित्तल यांनी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गणितेदेखील सोडवायला दिली, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेतील उपक्रम याबद्दल त्यांनी उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांचेदेखील कौतुक केले.

हेही वाचा :

The post Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट appeared first on पुढारी.