Nashik : स्मार्ट सिटी विरोधात एकवटले नाशिककर, गोदाघाटावर वारसास्थळांना वाहिली श्रद्धांजली

गोदाघाट आंदोलन,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

गोदाघाट येथील निलकंठेश्वर महादेव मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित वास्तू म्हणून नोंद असून त्याच्या ३०० मीटर परिघातामध्ये राज्य पुरातत्व विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणतेही कामकाज होऊ शकत नाही. हा कायदा असतांना स्मार्ट सिटीने जुलै २०२० पासून श्री गोदावरी नदीपात्रात कामकाज करतांना सांडव्यावरची देवीचा सांडवा तोडला. तर सुस्थितीत असलेल्या ७५० वर्ष जुन्या पुरातन दगडी पायऱ्या नाहक तोडल्या. अशीच चुकीची कामे येथे सुरू असून कामे सुरू करण्यापूर्वी वारसास्थळे पुनःबांधणीचे आश्वासन दिले होते. मात्र आता इतके महिने उलटूनही परिस्थिती जैसे थेच असल्याने जागृत नाशिककर आणि हिंदुत्ववादी संघटनांनी दुरुस्तीसाठी खोदून ठेवलेल्या वारसास्थळांना नाशिककरांच्या वतीने यशवंतराव महाराज पटांगणावर श्रद्धांजली वाहिली व सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

देवीचा सांडवा बांधून देण्याबाबत जे आश्वासन स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले त्याला पावणे तीन वर्ष झाली. गोदाघाट परिसरात काम करतांना अनेक छोट्या मंदिरांना तडे गेले. तर काही मंदिरे भग्न केली आहे. तर सुस्थितीत असलेल्या ७५० वर्ष जुन्या पुरातन दगडी पायऱ्या नाहक तोडल्या. या सर्व विध्वंसक बाबी राज्य पुरातत्व विभागाच्या निदर्शनात आम्ही आणून दिल्यानंतर पुरातत्व विभागाने स्मार्ट सिटी कंपनीला पायऱ्या दुरस्त करण्यासाठीचे पत्र दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस ठाणे यांनी सुद्धा पत्र दिले. त्याअनुषंगाने स्मार्ट सिटी कार्यालयात बैठका पार पडल्या व स्थळ पाहणी ही झाली. त्याला १० महिने उलटून गेली. तरी सुद्धा स्मार्ट सिटी कंपनी कुठलीही कारवाई करत नसून उलट यशवंत महाराज पटांगण प्रतिबंधित क्षेत्रात फारश्या बसवण्याचे काम सुरू आहे.

होळकर पुल ते गंगाघाट या पुररेषेत ६४ कोटींची कामे सुरू असून येत्या पावसाळ्यात हे सर्व वाहुन जाईल. तरी हे करतांना अनेक मुर्त्यांची हेळसांड होत आहे. तसेच पुरातन दगडी पायऱ्यांची तोडफोड केली जात आहे. या परिसरातील सामान्य नागरिकांना घराचे काम करतांना पुर रेषेचे कारण सांगून घराला परवानगी नाकारली जाते. मग यांनी पुरातत्व विभागाची परवानगी का घेतली नाही. गरज नसतांना सांडव्याची तोडफोड केली जाते. परंतु त्यांची पुनर्बांधणीचे आश्वासन पाळले जात नाही. गरज नसतांना स्मार्टच्या नावाखाली तोडफोड सूरू आहे. यापुढे कोणत्याही दगडी पायऱ्यांना हात लावु नये. कॉंक्रिटीकरण केलेली १७ कुंडाचे पुनर्जीवन प्रक्रिया त्वरित सुरू करावी. एक वर्षापासून आश्वासन देवून कामे प्रलंबित का असाही प्रश्न जमलेल्या नाशिककरांनी उपस्थित केला.

यावेळी सांडव्यावरील ज्या पायऱ्या शहीद झालेल्या आहे. त्यांना हार, पुष्प वाहुन आदरांजली वाहिली. व आठ दिवसांच्या आत याच ठिकाणी बैठक घेऊन या संदर्भात सर्व प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी करण्यात आली व त्याबाबतचे निवेदन स्मार्ट सिटी कंपनी अधिकारी हिरे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी देवांग जानी, सतिश शुक्ल, प्रफुल संचेती, मामा राजवाडे, कल्पना पांडे, रामसिंग बावरी, अंबादास खैरे, अनिकेत शास्त्री, किरण पानकर, योगेश बर्वे, अजिंक्य गिते, प्रविण भाटे, धनंजय पुजारी, नामदेव पवार, महेश महांकाळ, सचिन आहिरे, व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

नाशिककरांच्या प्रमुख मागण्या

 

१) स्मार्ट सिटी कंपनीने तोडलेला श्री गोदावरी नदी पात्रातील देवीचा सांडवा पूर्ववत बांधून द्यावा.

२) यशवंत महाराज पटांगण येथे तोडलेल्या पुरातन दगडी पायऱ्या पुरातन पद्धतीने बसवून द्याव्या.

३) स्मार्ट सिटी कंपनीने तोडलेली श्री गणपतीची मूर्ती विधिवत तयार करून पुन:स्थापित करावी.

४) सांडवा तोडताना छोट्या मंदिरांना भेगा पडलेल्या आहेत त्याची दुरस्ती करून द्यावी.

५) गोपिकाबाई तास येथे पायऱ्यांवर कोरीव कासव आहे त्याचे संरक्षण जतन करावे.

६) श्री गोदावरी नदी पात्रातील प्राचीन कुंडातील उर्वरित तळ सिमेंट काँक्रिट तात्काळ काढावे.

७) नदीतील काँक्रीट काढून प्राचीन सतरा कुंडाची निर्मिती करून गोदाघाटाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यावे.

८) गोदाघाट परिसरातील हेरिटेज अस्तित्व अबाधित ठेवून पुढील कामे करावी. या मागण्या पूर्ण करण्याची लेखी हमी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने द्यावी.

स्मार्टसिटीच्या वतीने अनेक कामे शहरभर सुरु आहे. मात्र, ही कामे मनमानी पद्धतीने सुरु असल्याने त्याचा त्रास सामान्य नाशिककरांना सहन करावा लागत आहे. नाशिकच्या वैभवात भर घालण्याऐवजी स्मार्टसिटीचे अधिकारी नाशिकची ओळख आणि त्याचा प्राचीन इतिहास पुसण्याचे पाप करीत असल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. यापुढे नाशिकच्या इतिहासाला हात लावून छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

– मामा राजवाडे

यावेळी नाशिककरांचे निवेदन स्विकारण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीचे व्यवस्थापक सुमंत मोरे, किंवा सक्षम अधिकारी हजर नसल्याने नाराजी व्यक्त केली गेली. पुढील कामाबाबत त्वरित लेखी आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी द्यावे. अशी मागणी केल्यानंतर उपस्थित सहाय्यक अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी त्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ स्मार्ट सिटी कंपनी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

The post Nashik : स्मार्ट सिटी विरोधात एकवटले नाशिककर, गोदाघाटावर वारसास्थळांना वाहिली श्रद्धांजली appeared first on पुढारी.