Nashik City Transport : ‘टोइंग’ मुळे बेशिस्ती धारेवर

टोईंग pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना शहर पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी टोइंग कारवाईला १ मे पासून सुरुवात केली आहे. तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या कंत्राटाला मुदत वाढ देत बेशिस्त वाहने टोइंग करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यामुळे वाहनतळांऐवजी टोइंगचा मार्ग प्रशस्त केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

शहरातील रस्त्यालगत अनेक वाहन चालक बेशिस्तरित्या वाहने उभी करतात. त्यामुळे पुरेसा रस्ता उपलब्ध होत नसल्याने वाहतुकीस अथडळे येतात. तसेच अनेकदा छोटे-मोठे अपघातही घडतात. त्यामुळे नागरिकांकडून शहरात पुरेसे वाहन तळ उपलब्ध करून देण्याची मागणी होत असते. मात्र, जागेअभावी हा प्रश्न कायम आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यामुळेही जागेचा अभाव आहे. दरम्यान, प्रशासनाने वाहन चालकांना पुरेसे वाहनतळ उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना त्याएेवजी टोइंग कारवाई सुरू केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी ७ एप्रिल २०२२ च्या करारानुसार कत्रांटास मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यानुसार १ मेपासून नाशिकमध्ये पुन्हा टोइंग सुरू केल्याचे वाहतूक शाखेने सांगितले.

पुर्वसूचना न देताच कारवाई
वाहतूक पोलिसांनी कोणतीही पुर्वसूचना न देता टोइंग कारवाई सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच टोइंग व्हॅनवरील कर्मचारी देखील कारवाई करण्याआधी कोणतीही पुर्वसूचना न देताच वाहने टोइंग करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त करीत आधी वाहन तळ द्यावे मग टोइंग कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

पोलिस म्हणतात वाहनतळ पुरेसे
पोलिसांच्या दाव्यानुसार शहरातील सरकारी कार्यालये, महापालिका, स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहनतळे उपलब्ध आहेत. अनेक रस्त्यांलगत ‘पी १ व पी २’ची सुविधा असून शहरात ‘पे अँड पार्क’ सुविधा उपलब्ध आहेत. तरीदेखील नागरिक ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने टोइंग कारवाईस सुरुवात झाली आहे.

याआधी टोइंग रद्द
याआधी सलग दीड वर्षे सुरू असलेली टोइंग कारवाई १५ मार्च २०२३ रोजी स्थगित करण्यात आली होती. तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी टोइंग सेवेसंदर्भातील आदेश रद्द केला होता. त्यानंतर वाहनचालकांकडून ई-चलानद्वारे दंड वसुली होत होती. मात्र, पुन्हा टोइंग कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे.

 

टोईंग pudhari.news      टोईंग pudhari.news

टोईंग pudhari.news
नाशिक: वाहतूक शाखेकडून कंत्राटदाराला मुदतवाढ मिळताच पथकाने अत्यंत वर्दळीच्या एमजी रोड भागाकडे मोर्चा वळविला. काही दिवसांपासून निर्धास्त झालेल्या वाहनचालकांची यामुळे भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावरील मार्किंग पाहिल्यानंतर अनेकांना आपले वाहन टोइंग झाल्याचा साक्षात्कार झाला.(छाया : हेमंत घोरपडे)

असे असेल टोइंग कारवाईचे दर
वाहन प्रकार                शासकीय दंड                 टोइंग शुल्क
दुचाकी                             ५००                           ९०
चारचाकी                           ५००                           ५३०

शहरात वाहनतळासाठी जागा उपलब्ध असून मार्किंग करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी मार्किंग किंवा फलक नसतील तेथे लवकरात लवकर लावले जातील. त्याचप्रमाणे वाहनांवर कारवाई करण्याआधी पुर्वसूचना देण्याचे आदेश आहेत. कारवाई करताना गर्भवती, ज्येष्ठ नागरिकांच्या वाहनांवर कारवाईत सुट देण्यास सांगितले आहे. – चंद्रकांत खांडवी, पोलिस उपआयुक्त, शहर वाहतूक शाखा.

हेही वाचा: