Nashik Crime | अंबडला तलवारीचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेला, जबरी चोरीचा गुन्हा दाखल

मोबाईल हिसकावला mobile theft

सिडको : पुढारी वृत्तसेवा- सायंकाळच्या सुमारास मद्यपान करत बसलेल्या दोन मित्रांना रिक्षातून आलेल्या चार अनोळखी इसमांनी तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना अंबड परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी शांताराम बाळू कडू (वय ३८, रा. दत्तनगर, कारगिल चौक, सिडको) हे चालक आहेत. दिनांक २८ एप्रिल रोजी कडू हे ट्रान्स्पोर्ट कंपनीमध्ये काम करणाऱ्या आकाश ससाणे (रा. पिंपळद, ता.जि. नाशिक) याचे लग्न होते. त्यासाठी कंपनीतील कर्मचारी ट्रान्सपोर्ट मालक अतुल अहिरराव यांच्या मालकीचे आयशर वाहन घेऊन लग्नाला गेले होते.

लग्न आटोपून फिर्यादी कडू व त्यांचे मित्र हे ट्रान्सपोर्ट कार्यालयात गाडी लावून माघारी फिरले. त्यानंतर फिर्यादी कडू त्यांचे मित्र विनोद साबळे व अतुल अहिरराव असे तिघे जण अंबड एमआयडीसीमध्ये सतिश कंपनीच्या बाजूला दारु पित बसले होते. त्यावेळी एका रिक्षामधून आलेल्या ४ अनोळखी इसमांपैकी दोन जण खाली उतरले. ते फिर्यादी कडू व त्यांच्या मित्रांकडे आले. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या तलवारीचा धाक दाखवून कडू यांच्या शर्टाच्या खिश्यात असलेला ओपो कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला. तसेच शिवीगाळ करुन मारहाण करण्याची
धमकी देऊन आलेल्या रिक्षातून पळून गेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध
जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –