Nashik Crime : …अन् अंबडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शुभमचा डाव फसला

नाशिक क्राईम

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा

अंबडच्या महालक्ष्मीनगर परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या मयूर दातीर खून प्रकरणातील संशयित करण कडूस्कर याला धारदार शस्त्र पुरवणाऱ्या पाचव्या संशयित शुभम दातीर (२२, रा. अंबड) याला पोलिसांनी अटक केली. मयुरचा खुन कडुस्करकडून झाल्यानंतर तो गजाआड जाताच अंबड भागात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शुभमचा डाव पोलिसांनी अचूक दिशेने तपास करत उधळून लावला.

अंबडच्या महालक्ष्मीनगर येथील हनुमान मंदिर चौकात गुरुवारी (दि.१७) दुपारी अडीचच्या सुमारास मयूर केशव दातीर (२१) याच्यावर धारदार शस्त्र, चॉपरच्या सहाय्याने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित करण कडुस्कर, मुकेश मगर, रवी आहेर आणि या तिघांना आश्रय देणारा राकेश शेलार या चौघांना अटक करत खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार शस्त्र मयूर दातीर याचा नातेवाईक शुभम दातीर याने पुरविल्याची कबुली कडुस्करने दिली. अंबड पोलिसांनी शनिवारी (दि. १९) रात्री संशयित शुभम दातीर यास अटक केली.

शुभम याची चौकशी केली असता संशयित करण कडुस्कर हा मयत मयूर दातीर याचा खून करणार असल्याची माहिती १७ ऑगस्टला सकाळपासूनच असल्याचे उघड झाले. याच दिवशी शुभम दातीर याने पोलिसांसोबत राहत संशयित करण कडुस्कर याला पकडून देण्यासाठी मदत करतो, असे भासवून दिशाभूल केली होती. दिशाभूल करणाऱ्या शुभम दातीर याच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम यास रविवारी न्यायालयात हजर केले असता २५ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शुभमची हत्येतील सहभागाची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पत्रकार परिषदेत देताना सारा घटनाक्रम स्पष्ट केला.

साहेब विकेट पडली

शुभम दातीर हा मयुर दातीर खुन घटनेच्या दिवशी दुपारी एकला अंबड औद्योगिक वसाहतीतील पोलिस चौकीत आला होता. तेथील गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संदिप पवार यांची भेट घेतली व करण कडुस्करचा तुम्ही तपास करत आहे. तो आज येणार असल्याचे त्याने मला सांगितले. या घटनेनंतर एकाचा शुभमला फोन आला व मयुर याचा खुन झाल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. लगेच त्याने पोलिस उपनिरीक्षक पवार यांना सांगितले की साहेब विकेट पडली. यानंतर पोलिस उपनिरीक्षक पवार यांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेऊन आरोपीला अटक होईपर्यत त्याला ताब्यात ठेवले होते.

अंबडच्या महालक्ष्मीनगर परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या मयूर दातीर खून प्रकरणातील आरोपी सापडले म्हणून तपास थांबविलेला नसुन यातील अजून काहींचा समावेश आहे का? याबाबत तपास सुरु राहणार आहे.

-मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त

हेही वाचा :

The post Nashik Crime : ...अन् अंबडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शुभमचा डाव फसला appeared first on पुढारी.