Nashik Crime : कारसाठी योगेश मोगरे यांचा खून; हरियाणातून संशयित ताब्यात

योगेश मोगरे ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत एखाद्या व्यक्तीचे अपहरण करून खंडणीची मागणी करीत बक्कळ पैसा कमवू, असा कट हरियाणामधील दोघा संशयितांनी रचला. त्यासाठी कारची आवश्यकता असल्याने त्यांनी नाशिकमधून कार चोरण्याचा निर्णय घेतला व ते थेट पाथर्डी फाटा परिसरात आले. तेथे योगेश मोगरे यांची कार चोरताना झटापट झाल्याने संशयितांनी मोगरे यांच्यावर शस्त्राने वार करून जिवे मारत त्यांची कार पळवून नेल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मोगरे हत्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणामधून १७ वर्षीय संशयितास ताब्यात घेतले आहे. तर मुख्य संशयित फरार आहे.

अंबड औद्याेगिक वसाहतीतील रोहिणी इंडस्ट्रिजचे सीईओ योगेश मोगरे यांचा २३ मार्चला पाथर्डी फाटा परिसरातील सर्व्हिस रोडवर खून झाला होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीस पूर्ववैमनस्यातून मोगरे यांचा खून झाल्याचा संशय वर्तवला जात होता. मात्र, सखोल तपासात खुनाचे वेगळेच कारण समोर आले.

पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणामधून तीन युवक मुंबईला फिरण्यासाठी १५ मार्चला आले. त्यापैकी एक युवक पुन्हा हरियाणात गेला तर अल्पवयीन संशयितासह अजितसिंग सत्यवान लठवाल (रा. चुडाणा, राज्य हरियाणा) हे दोघे मुंबईतच थांबले. त्यांनी मुंबईत एखाद्या व्यक्तीचे अपहरण करून खंडणी मागण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांना कारची गरज होती. मुंबईत कार चोरी करता न आल्याने ते २३ मार्चला दुपारी नाशिकला आले. पाथर्डी फाटा परिसरात रेकी केली. त्यावेळी मोगरे हे एका पानटपरीवर सिगारेट पित असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी मोगरे यांच्याकडील कारची चावी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोगरे यांनी विरोध केल्याने मारेकऱ्यांनी त्यांच्यावर शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर संशयितांनी मोगरे यांची एमएच १५ एचवाय ४९५९ क्रमांकाची कार चोरून नेली. मात्र, संशयितांनी कार बेलगाव कुऱ्हे येथे सोडून फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कागदपत्रांच्या आधारे संशयितांची ओळख पटवून दोघांपैकी एकास पकडले. गुन्हे शाखेचे एक पथक हरियाणात तळ ठोकून असल्याचेही बच्छाव यांनी सांगितले.

असा लागला सुगावा

मारेकऱ्यांबाबत धागेदोरे मिळत नसल्याने पोलिसांनी घटनास्थळाची पुन्हा पाहणी केली. त्यावेळी तेथे एक पिशवी आढळली. पिशवीत कपडे खरेदी केल्याची पावती होती. त्यावरून पोलिसांनी संबंधित शोरूममध्ये जाऊन चौकशी केली. तसेच घटनास्थळ, शोरूम, रेल्वेस्थानक, मुंबईतील विविध ठिकाणच्या सीसीटीव्हींची पाहणी केल्यानंतर संशयितांची ओळख पटली. त्याचप्रमाणे मोबाइल क्रमांक शोधून संशयितांच्या मागावर जात पोलिसांनी अल्पवयीन संशयितास पकडले.

इंधन नसल्याने कार सोडली

कार चोरल्यानंतर संशयित मुंबईच्या दिशेने पसार झाले. मात्र कारमध्ये १५ किमी जाईल इतकेच इंधन असल्याचे संशयितांना लक्षात आले. त्याचप्रमाणे कारची काच फुटलेली होती आणि कारमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले असल्याने कारमुळे पकडले जाऊ, अशी भीती दोघांना वाटली. त्यामुळे त्यांनी चोरलेली कार बेलगाव कुऱ्हे परिसरात सोडून पळ काढला.

The post Nashik Crime : कारसाठी योगेश मोगरे यांचा खून; हरियाणातून संशयित ताब्यात appeared first on पुढारी.