Nashik Crime : पोलिस वाहनाच्या धडकेत संशयित चोर ठार

file photo

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील संशयित चोरटा पाठलागावर असलेल्या पोलिस वाहनाची धडक बसून ठार झाल्याची घटना किशाेर सूर्यवंशी मार्गावर घडली. ठार झालेल्या संशयिताची ओळख पटलेली नसून पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिस वाहनाचे ॲक्सल रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास पकडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर सूर्यवंशी मार्गावरील एटीएममध्ये काही चोरटे शिरल्याची माहिती म्हसरूळ पोलिसांना मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास मिळाली. त्यानुसार गस्तीवरील पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्याचवेळी किशोर सूर्यवंशी मार्गावरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधील चोरटे पोलिस वाहन पाहून एटीएम केंद्रातून बाहेर पडत पळत सुटले. त्यातील एक संशयित एटीएम केंद्रालगच्या एका छोट्या कॉलनी रोडने पळत होता. या संशयिताच्या मागावर एमएच १५ एए २४५ क्रमाकांच्या पोलिस वाहनातून योगेश सासकर व प्रशांत देवरे यांच्यासह तिघे पोलिस पाठलाग करीत होते. वळण घेताच वाहनाचा एक्सल तुटल्याने वाहनाची चोरट्यास धडक बसल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात संशयित चोर गंभीर जखमी झाला, तर वाहनातील तिघे पोलिसही किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या संशयितास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान, संशयिताचा मृत्यू झाला. मृताची ओळख पटलेली नसून पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्याचे नाव प्रशांत असल्याचे समजते. या प्रकरणी सुरुवातीस पोलिसांनी गोपनीयता ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दरम्यान, सकाळी घटनास्थळावर अचानक पोलिसांचा ताफा पाहून स्थानिकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात फौजफाटा तैनात केला होता. मृत संशयिताची ओळख सोमवारी सायंकाळपर्यंत पटलेली नव्हती. मात्र, त्याच्या हातावर प्रशांत नाव गोंदवलेले पोलिसांना दिसून आले. त्यामुळे पोलिस संशयिताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अपघाताची नोंद केली आहे.

रात्रीत तीन एटीएम फोडले

पोलिस तपासात चोरट्यांनी म्हसरूळच्या हद्दीत तीन एटीएम फोडल्याचे आढळून आले आहे. चोरटे हे परराज्यातील असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच एटीएम केंद्रात चोरीसाठी लागणारे हत्यारे आढळून आली असून, पोलिसांनी ती जप्त केली आहेत. सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. संशयित चोरट्यांनी अंगावर एकावर एक अशी तीन ते चार कपडे घातली होती. मृत संशयिताच्या अंगावरही अशीच कपडे आढळून आली असून, पोलिस संशयितांचा रेकॉर्ड शोधत आहेत.

अपघाताचा तपास होणार

पाठलागादरम्यान, वाहनाचा एक्सल तुटल्याने एका संशयिताचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, अपघाताचा तपास सुरू केला आहे. यात प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनाची तपासणी केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेने पोलिस दलातील जुनाट वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : पोलिस वाहनाच्या धडकेत संशयित चोर ठार appeared first on पुढारी.