नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अयोध्या ही रामाची जन्मभूमी असली, तरी संपूर्ण रामायण नाशिकच्या भूमीत घडले आहे. त्यामुळे रामायण घडवण्यासाठी महाअधिवेशनानिमित्त आम्ही येथे काही निर्णय घेणार आहोत, असे नमूद करत, शिंदे गटाचा बाळासाहेब ठाकरे आणि अयोध्येशी दुरान्वये संबंध नाही. रामाने ज्यांचा वध केला, अशी ही पात्रे आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. रामाच्या पूजेचे ढोंग करून रावणराज्य चालवले जात आहे, अशा शब्दांत केंद्र व राज्य सरकारवर त्यांनी प्रहार केला.
ठाकरे गटाच्या अधिवेशनाच्या तयारीनिमित्त खा. राऊत यांचे शनिवारी (दि. २०) सायंकाळी नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकवर विशेष प्रेम होते. त्यामुळेच त्यांच्या जयंतीदिनी दि. २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. बाळासाहेबांचे स्मारक मुंबईत असले, तरी या अधिवेशनातून त्यांना अभिवादन केले जाईल. सोमवारी (दि. २२) अयोध्येत श्रीरामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा होतोय. अयोध्येतील लढ्यात बाळासाहेबांचे मोठे योगदान होते. नाशिकच्या भूमीत संपूर्ण रामायण घडले. त्यामुळे नाशिकच्या भूमीतून रामायण घडवण्यासाठी येथे महाअधिवेशन होत असून, या माध्यमातून आम्ही काही निर्णय घेणार आहोत. उद्धव ठाकरेंना अयोध्येच्या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका उशिरा दिली. मात्र नट-नट्यांना हे निमंत्रण अगोदर पोहोचले, हा नतद्रष्टपणा, दळभद्रीपणा आहे. अयोध्येच्या लढ्यात ठाकरे कुटुंबीयांचे योगदान असताना त्यांना अशी वागणूक दिली जात असेल, तर प्रभू श्रीराम अशा लोकांना शाप दिल्याशिवाय राहणार नाही. हा राजकीय सोहळा त्यांचा शेवटचा ठरेल. २०२४ च्या निवडणुकीत प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद त्यांना मिळणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर टीका केली.
ठाकरे गटातील नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईबाबत राऊत म्हणाले की, सध्या रामाच्या पूजेचे ढोंग करून रावणाचे राज्य सुरू आहे. ते सत्यवचनी असते, तर असे वागले नसते. जनतेच्या न्यायालयात त्यांचे मुखवटे समोर आल्याने त्यांचा तीळपापड झाला आहे. त्यामुळेच ठाकरे गटाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांवर शासकीय यंत्रणांना हाताशी धरून खोट्या कारवाया सुरू आहेत. सुरज चव्हाण यांना अटक झाली. या प्रकरणातील खरे गुन्हेगार शिंदे गट आणि भाजपमध्ये आहेत. हिंमत असेल, तर या सर्वांना समान न्याय मिळायला हवा, असेही त्यांनी सांगितले. शिंदे गटाच्या होर्डिंग्जवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो झळकत आहेत. याविषयी विचारले असते, शिंदे गटाचा बाळासाहेबांशी, अयोध्येशी दुरान्वयेही संबंध नाही. रामायणात ज्यांचा रामाने वध केला,अशी ही पात्र आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
पंतप्रधानांना सावरकरांचा विसर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यावरही राऊत यांनी टीका केली. सावरकरांच्या नावाचा राजकीय जप करणाऱ्यांना नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर सावरकरांचा विसर पडला. काळाराम मंदिरात दर्शन घेतले. परंतु या मंदिरात ज्यांनी सत्याग्रह केला, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीदेखील त्यांना आठवण झाली नाही. आम्हाला मात्र विस्मरण होणार नाही. उद्धव ठाकरे नाशिकमध्ये आल्यानंतर २२ जानेवारीला सर्वप्रथम भगूर येथील सावरकरांच्या स्मारकाला भेट देतील, असे राऊत यांनी सांगितले.
अधिवेशनात १७०० प्रतिनिधींचा सहभाग
दि. २२ व २३ रोजी नाशिकमध्ये महाराष्ट्राला दिशा देणारे अत्यंत भव्य असे धार्मिक आणि राजकीय उत्सव होत आहेत. सोमवारी (दि. २२) नाशकात उद्धव ठाकरेंचे आगमन झाल्यानंतर ते सर्वप्रथम भगूर येथील सावरकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर काळाराम दर्शन व गोदाआरती केली जाईल. मंगळवारी (दि. २३) हॉटेल डेमोक्रसी येथे सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत राज्यस्तरीय अधिवेशन होईल. या अधिवेशनाला राज्यभरातील १७०० प्रतिनिधी उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खुल्या अधिवेशनाच्या रूपाने उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होईल, असेही राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा:
- Nashik I ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाची जय्यत तयारी
- Maharashtra Politics : महायुतीच्या शिडात फडणवीसांचे वारे
- Ayodhya Ram Mandir : …तेव्हा डोळ्यात अँटिबायोटिक्स घालून शिल्पकार अरुण यांनी घडविली मूर्ती
The post Nashik I शिंदे गट म्हणजे रामायणात वध झालेली पात्रे - खासदार संजय राऊत appeared first on पुढारी.