Nashik I प्रभू रामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास

विरेंद्रसिंग गोपाळसिंग टीळे pudhari.news

नाशिक : सतीश डोंगरे

प्रभू श्रीरामाने सर्वाधिक काळ वास्तव्य केलेल्या नाशिकनगरीतील एक भक्त प्रभू श्रीरामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास करीत निघाला आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रवास सुरू असून, २५ ते २६ जानेवारीपर्यंत प्रभू श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीत हा भक्त पोहोचणार आहे. तोंडी श्रीरामाचे नामस्मरण करीत हा प्रवास सुरू असून, तब्बल दीड हजार किमीचा हा संपूर्ण प्रवास आहे.

रविवार कारंजा येथील रहिवासी असलेल्या विरेंद्रसिंग गोपाळसिंग टीळे यांनी प्रभू श्रीरामाच्या भेटीसाठी चक्क नाशिक ते अयोध्या पायी प्रवास करण्याचे ठरविले. २१ डिसेंबर २०२३ रोजी त्यांनी काळारामाचे दर्शन अन् गोदावरीचे तीर्थ घेवून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. दररोज ३५ ते ५० किमी पायी प्रवास करीत, आता ते प्रयागराज येथे पाहोचले आहेत. २५ ते २६ जानेवारी रोजी ते अयोध्या येथे पोहोचण्याची शक्यता आहे. दररोज सकाळी ४.३० वाजता उठून, आंघोळ केल्यानंतर रामरक्षा पठण करून ते आपल्या प्रवासाला सुरुवात करतात. सोबत एक ड्रेस, चादर, शाल, काही औषधी, मोबाइल, बिस्कीटांचे दोन पुडे, केळी एवढे साहित्य असलेली बॅग घेवून ते मार्गस्थ होतात. सोबत एका कमंडलूमध्ये गोदावारीचे तीर्थ घेवून रामनामाचे स्मरण करीत प्रवास करतात. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी गावांमधील धर्मशाळांमध्ये वास्तव्य केले. मात्र, याठिकाणी पुरेशा सोयीसुविधा नसल्याने ते महामार्गांवरील हॉटेलांमध्ये वास्तव्य करीत आहेत. दरम्यान, रविवारी (दि.२१) ते प्रयागराज येथे पोहोचले असून, २५ ते २६ जानेवारीपर्यंत ते अयोध्यानगरीत पोहोचण्याची शक्यता आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर श्रीरामाला ते गोदावारीने जलाभिषेक करू इच्छितात. त्यांची ही भक्ती बघून प्रवासात भेटणारे नागरिक देखील चकीत होत असून, त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

प्रभू श्रीरामाने नाशिकनगरीत दीर्घकाळ वास्तव्य केले आहे. त्यांच्या पदस्पर्शाने नाशिकनगरी पुण्यभूमी झाली आहे. एक नाशिककर म्हणून त्यांच्या भेटीला जाण्याचा मोह झाल्याने, पायी प्रवास करण्याचे ठरविले. बघता-बघता श्रीरामाच्या जन्मस्थळापर्यंत पोहोचलो आहे. आता त्यांच्या दर्शनाची आतुरता आहे.  – विरेंद्रसिंग टीळे, रामभक्त.

हेही वाचा:

The post Nashik I प्रभू रामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास appeared first on पुढारी.